केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे रेल्वे अधिकाऱयांना आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
पुणे ते मिरज व मिरज ते लोंढा असे दोन टप्प्यात रेल्वे दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मध्यंतरी कोरोनामुळे या कामाची गती मंदावली होती. परंतु आता पुन्हा एकदा युद्धपातळीवर हे काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी नैर्त्रुत्य रेल्वे व मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिले.
शुक्रवारी सकाळी रेल्वे राज्यमंत्र्यांनी दुपदरीकरणाचा आढावा घेण्यासाठी ऑनलाईन कॉन्फरन्स बोलाविली होती. यामध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व नैर्त्रुत्य रेल्वेच्या बेंगळूर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आतापर्यंत झालेले काम व उर्वरित कामाची मंत्र्यांनी माहिती घेतली. एकूण 3 हजार 600 कोटी रुपये खर्चून पुणे ते लोंढा या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण
महाराष्ट्रातील सातारा, पुणे व सांगली येथे काही ठिकाणी जमीन हस्तांतरणाचे काम अपूर्ण होते. याबाबत रेल्वे राज्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी त्या जिल्हाधिकाऱयांची बैठक घेऊन जमीन हस्तांतरण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित जिल्हय़ांमधील खासदारांच्या सहकार्याने जमीन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मंत्री अंगडी यांनी सांगितले.
मुंबई-बेळगाव प्रवास होणार सुखकर
दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास बेळगाव-पुणे, बेळगाव-मुंबई हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. दोन रस्ते असल्यामुळे क्रॉसिंगचा प्रश्न उरणार नाही. याबरोबरच लोंढा ते बेंगळूर दरम्यान दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने बेंगळूर प्रवासही सुखकर होणार आहे. त्यामुळे या दुपदरीकरणाचे काम लवकर करण्याची सूचना मंत्री सुरेश अंगडी यांनी केल्या आहेत. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला नैर्त्रुत्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ए. के. सिंग उपस्थित होते.









