ऑनलाईन टीम / पुणे :
भाजपच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचे रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आले आहेत. स्वतः मुक्ता टिळक यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली.

त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, आमच्या दोघींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही सेल्फ आयसोलेशनमध्ये असून घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहोत. तसेच कुटुंबियातील अन्य सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार योगेश टिळक यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या पुणे विभागातील 22 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 36 हजार 671 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 13 हजार 342 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 702 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.12 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे.









