गुरुवारी रात्री धावपट्टी न मिळाल्याने विमान बेंगळूरला
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवडाभरापासून बेळगावसह परिसराला परतीच्या पावसाने झोडपले. पाऊस व ढगाळ वातारणाचा फटका विमानसेवेलाही बसत आहे. गुरुवारी रात्री पुण्यावरून बेळगावला आलेल्या विमानाला धावपट्टी न मिळाल्याने 5 ते 6 वेळा या विमानाने घिरटय़ा घातल्या. परंतु धावपट्टीच मिळत नसल्याने अखेर हे विमान बेंगळूर विमानतळावर उतरविण्यात आले. यामुळे बेळगावला उतरणाऱया प्रवाशांना बेंगळूरला जावे लागले.
चार दिवसांपूर्वीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. ढगाळ वातावरणामुळे तीन विमाने माघारी गेली होती. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे. या सर्वाचा फटका विमान सेवेला बसत आहे. ढगाळ वातावरण असल्यास प्रवाशांना इतर विमानतळावर उतरविण्यात येत असल्याने प्रवाशांना उलट प्रवास करत शहर गाठावे लागत आहे.
पावसामुळे पुणे येथून उशिराने उड्डाण घेतलेले विमान रात्री 10 च्या सुमारास बेळगावमध्ये आले. परंतु त्या विमानाला ढगाळ वातावरणामुळे धावपट्टी मिळाली नाही. या विमानाने 5 ते 6 वेळा धावपट्टी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरता. रात्री 10.30 हे विमान शहराच्या आजूबाजूने घिरटय़ा घालत होते. अखेर हे विमान बेंगळूर विमानतळावर उतरविण्यात आले. यामुळे बेळगावला येणाऱया प्रवाशांना बेंगळूरला सोडण्यात आले.
हैद्राबाद सेवेलाही बसलाहोता फटका
आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन राज्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजविला होता. हैद्राबाद विमानतळावर पावसामुळे धावपट्टीचे नुकसान झाले होते. त्यामुळे काहीकाळ हैद्राबाद विमानतळावर विमान लँडिग करणे थांबविण्यात आले होते. यामुळे बेळगाव – हैद्राबाद या विमान सेवेलाही याचा फटका बसला होता. यामुळे हैद्राबादला जाणारी काही विमाने दोन दिवसांपूर्वी रद्द करण्यात आली होती. आता ही विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे.









