प्रतिनिधी / कराड
पुणे पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे इच्छुक असणारे व गेल्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झालेले सारंग पाटील यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा धक्कादायक निर्णय सोमवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत जाहीर केला. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सातारा जिल्ह्यातील जनतेने आपले वडील श्रीनिवास पाटील यांना खासदारकीची संधी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासदारांच्या कामाला वेळ देण्यासाठी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सारंग पाटील यांनी सांगितले.
सारंग पाटील यांनी सोमवारी पुण्यातून कराड व साताऱ्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधत हा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की, गेल्या पुणे पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आपण नवखे असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपणास उमेदवारी दिली. पक्षाचे कार्यकर्ते व पदवीधरांच्या पाठबळाच्या जोरावर आपला केवळ 2 हजार मतांनी पराभव झाला. यानंतर पक्षाने आयटी सेलचे प्रदेशाध्यक्षपद दिले. ते सांभाळत विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ कमिटीचा कार्यक्रम राज्यात राबवताना तळागाळापर्यंत पोहोचता आले. यातूनच पदवीधर निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देता आले. मात्र गेल्या ऑक्टोबरमध्ये अनपेक्षितरीत्या सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली. त्या निवडणुकीत माझे वडील श्रीनिवास पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली. सातारा जिल्ह्यातील जनतेने त्यांना निवडून देऊन जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी दिली.
देशात सध्या कोरोनाचे संकट असून विकास कामांच्या निधीला मर्यादा येत आहेत. जनतेलाही त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही देशाची पूर्ण अर्थचक्र सुरू होण्यास बराच अवधी जाणार आहे. यातच श्रीनिवास पाटील यांनी यापूर्वी खासदार म्हणून केलेल्या कामामुळे त्यांच्या कार्यालयावर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत सुमारे 500 किलोमीटर व 58 विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षेत्र असणाऱ्या व पाच जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी वेळ देणे हे आपणास शक्य होणार नाही. याशिवाय सातारा जिल्ह्यात खासदारकीचे काम असल्याने केवळ पदवीधरच्या निवडणुकीसाठी राजकारण करणे हे आपणास योग्य वाटत नाही. अजूनही या निवडणुकीची कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही. तसेच या निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील जनतेच्या कामांकडे तसेच विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये, या भूमिकेतून 10 जुलैला आपण पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र पाठवून पुणे पदवीधरच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझ्या नावाचा विचार करू नये, अशी विनंती केली आहे.
पुणे पदवीधरच्या निवडणुकीसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी केली असून गेली काही वर्षे आपण या मतदारसंघात उमेदवार म्हणून काम करत आहोत. तथापि या निवडणुकीत आपण उभे राहणार नसून पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याच्या पाठीमागे आपली ताकद पूर्णपणे उभी करणार आहोत. राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे सारंग पाटील म्हणाले.
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबातील घटक म्हणून सातारा जिल्ह्यातील जनतेच्या आशा आकांक्षा, विकासकामे पूर्ण करण्यासाठी यापुढे पूर्णवेळ कटिबद्ध राहणार आहे. पक्षातील इतर इच्छुक उमेदवरांनाही आपला निर्णय कळवला आहे. जेणेकरून कोणतीही संभ्रमावस्था राहू नये. याबरोबरच पक्षासाठी पुणे पदवीधरमध्ये काम करत राहणार असल्याचे सारंग पाटील यांनी सांगितले.
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.