ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्ह्याचे माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोनामुळे निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळे प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी सरग यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. खबरदारी म्हणून 26 मार्च रोजी त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्तातील साखर वाढल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. प्रशासकीय कौशल्य व आजवरचे काम पाहून येत्या आठवड्यात सरग यांना बढती दिली जाणार होती. मंत्रालयातून तशी माहिती देण्यात आली होती. दुर्दैवानं त्यांची ही संधी हुकली.
दरम्यान, राजेंद्र सरग यांची पत्नी व एका मुलाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे पुण्याच्या ससून रुग्णालयात आज पहाटे दुःखद निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे, हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
- सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली

खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुणे जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सरग कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली! असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.








