ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील दांडेकर पूल परिसरातील आंबिल ओढय़ालगतच्या झोपडपट्टीवरील कारवाईची स्थगिती महापालिका न्यायालयाने शुक्रवारी उठवली. त्यामुळे महापालिकेला पुढील कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दांडेकर पूल येथील सर्वे क्रमांक 133, 135 येथे नाला सरळीकरण केले जाणार आहे. तेथील महापालिकेच्या अडीच एकर जागेवर झोपडपट्टी असून, या ठिकाणी खासगी विकसकामार्फत एसआरए योजना राबविण्यात येणार आहे.
पालिका न्यायालयाने स्थगिती उठवल्याने आता कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. बांधकाम हटविण्यावर स्थगिती होती. मात्र, आता महापालिकेकडून पुन्हा अतिक्रमण मोहीम राबविण्याची शक्मयता आहे. त्यामुळे पुन्हा आंबील ओढा येथील नागरिक आणि प्रशासनात राडा होण्याची शक्मयता आहे. तर जिल्हा न्यायालयात स्थानिक धाव घेणार आहेत. या कारवाईला स्थानिकांचा विरोध कायम आहे. आम्हाला न्याय मिळालाय पाहिजे अशी स्थानिकांनी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महापालिकेने जाहीर प्रकटन देऊन येथील झोपडपट्टीधारकांना संबंधित विकसकाशी संपर्क साधून स्थलांतर करावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी दांडेकर पूल येथे अतिक्रमण कारवाई करून झोपडय़ा हटविण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी प्रचंड गोंधळ होऊन, महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले होते.
महापालिकेच्या विधी सल्लागार ऍड. निशा चव्हाण यांनी सांगितले की, ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी महापालिका न्यायालयाने या कारवाईवर स्थगिती दिली होती. मात्र आता स्थगिती उठवली असल्याने पुढील कार्यवाही करता येणार असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.