खाते सुरु करण्यासाठी 550 रुपये खर्च
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अनेक वेळा अनेकजण पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (पीपीएफ) मध्ये खाते उघडतात, परंतु यामध्ये सलगची गुंतवणूक न केल्याच्या कारणास्तव सदरचे पीपीएफ खाते बंद होते. यामुळे जितकी रक्कम गुंतवणूक केली आहे, ती विनाकारण अडकून पडते. जर का हे खाते पुन्हा सुरु केल्यास त्याचा लाभ पीपीएफ खातेदारांना होणार असल्याची माहिती आहे.
पीपीएफ खाते पुन्हा सुरु करण्यासाठी खातेदारांना कोणत्याही बँक किंवा पोस्टाच्या कार्यालयात जाऊन लिखित स्वरुपात अर्ज सादर करावा लागेल आणि त्याच्यानंतरच बंद असलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरु करण्याची संधी मिळणार आहे. या प्रक्रियेसाठी कमीत कमी 500 रुपये वर्षासाठी द्यावे लागणार असून यासोबत 50 रुपयाची दंड आकारणी केली जाणार असल्याचीही माहिती आहे.
खाते बंद झाल्यास नुकसान
सरकारने 2016मध्ये पीपीएफ नियमामध्ये महत्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये सरकारने काही विशेष बदल केले असून यामध्ये मॅच्युरिटीच्या अगोदर पीपीएफ खाते बंद करण्यासाठी मान्यता दिली आहे. जीवघेण्या आजारावर उपचार किंवा मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी अशी मान्यता मिळण्याची माहिती आहे. परंतु हे खाते कमीत कमी पाच वर्षासाठी कार्यरत राहण्याची अट आहे.
पीपीएफ खाते कसे होते निष्क्रिय
पीपीएफ खात्यामध्ये वर्षाला कमीत कमी 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागते. एक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयाची रक्कम खात्यात जमा करता येते. परंतु जर का एखाद्या आर्थिक वर्षात 500 रुपये जमा केले नाहीत तर संबंधीत पीपीएफ खातेदाराचे खाते निष्क्रिय केले जाते.









