वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यात पुरूष आणि महिला विभागातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंची निवड केली जाते. जानेवारी 2022 च्या महिन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा किगेन पीटरसनची तर महिला विभागात इंग्लंडची कर्णधार हिथेर नाईट यांची सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून घोषणा करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील सध्या सुरू असलेल्या विविध मालिकांच्या ऍशेस मालिकेत इंग्लंडच्या नाईटने एकमेव कसोटीत शानदार कामगिरी करताना 216 धावा जमविल्या. या सामन्या नाईटने पहिल्या डावात नाबाद 168 धावांची खेळी केली होती. हा एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
पुरूषांच्या विभागात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज किगेन पीटरसनने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पुढील दोन सामने जिंकून ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. या मालिकेत तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करणाऱया पीटरसनने 61 धावांच्या सरासरीने 244 धावा जमवित मालिकावीराचा बहुमान पटकाविला होता.









