उमेदवारांनी केला विगचा वापर : विगमध्ये घातले होते थर्मोकोलचे तुकडे
प्रतिनिधी / बेळगाव
नागरी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी मच्छे व बेळगाव येथे भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. काही उमेदवारांनी उंची वाढविण्यासाठी नामी शक्कल लढविल्याचे सामोरे आले आहे. केसाच्या विगमध्ये थर्मोकोलचे तुकडे ठेवून उंची वाढविण्याचा प्रयत्न झाला आहे.
राज्य राखीव दलाचे मच्छे येथील मैदान व बेळगाव येथील पोलीस परेड ग्राऊंडवर दोन ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत. यासंबंधी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर मार्केट व बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात
आले आहेत. पीएसआय होण्यासाठी आलेल्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कुलगोडमधील एकजण ताब्यात
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली. गुरुवारी सकाळी येथील डीएआर मैदानावर कुलगोड, ता. मुडलगी, जि. बेळगाव येथून शारीरिक चाचणीसाठी आलेल्या उमेश एन. वाय. या परीक्षार्थीला पोलिसांनी ताब्यात घेतले. खरे तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आपली उंची भरत नाही, याची पुरेपूर कल्पना त्याला होती. तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.

थर्मोकोलचे तुकडे डोक्मयावर ठेवून त्यावर विग घातला होता. जेणेकरून शारीरिक चाचणीत उंची भरावी, असे प्रयत्न होते. मात्र, हा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यावर भादंवि 420 कलमान्वये एफआयआर दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी करण्यात येत होती.
दुरदुंडीतील एकावर एफआयआर
दुसरी घटना मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या दुसऱया बटालियनच्या मैदानावर उघडकीस आली. बाळेश सन्नाप्पा दुरदुंडी, रा. जागनूर, ता. चिकोडी यानेही आपल्या डोक्मयावर थर्मोकोलचे तुकडे ठेवून त्यावर विग घातला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादंवि 420 व 511 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









