कोरोनाशी सारा देश लढतो आहे. या लढय़ात आर्थिक योगदानासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष निधी जमविण्यास प्रारंभ केला आहे. या पीएम ‘केयर्स’ निधीसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या सर्व स्टाफने तब्बल 10 लाखांचे योगदान दिले आहे.
बेळगाव ः प्रतिनिधी
जिल्हाधिकारी डॉ. एम. बी. बोम्मनहळळी यांच्याकडे लोकमान्यचे सीएफओ विरसिंग भोसले, सीईओ अभिजित दिक्षित, रिजनल मॅनेजर आर. एम. कुलकर्णी यांनी हा धनादेश दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी बोम्मनहळळी यांनी लोकमान्यचे आभार मानले. यापूर्वी सीएम रिलिफ फंडाला लोकमान्य मलि्
टपर्पज सोसायटीच्यावतीने 11 लाखांचा धनादेश पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे देण्यात आला होता.
कर्नाटकबरोबरच गोवा सरकारलाही तब्बल 11 लाख रूपये देण्यात आले आहेत. संस्थापक चेअरमन किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी देण्यात आला आहे. आता कर्मचारी वर्गानेही आपले कर्तव्य समजून एक दिवसाचे वेतन दिले आहे. लोकमान्य सोसायटीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनासारख्या भयानक आजाराचा सामना संपूर्ण जगाला कारावा लागत आहे. आपल्या देशालाही या आजाराने हैराण केले आहे. त्यामुळे मदत करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. त्यामुळेच लोकमान्य समुहाने मदतीसाठी आता तत्परता दाखवली आहे.









