दि बेळगाव ट्रेडर्स फोरमचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन : त्वरित कार्यवाहीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावचा विस्तार वाढत चालला आहे. औद्योगिक वसाहत, न्यायालये, विमानतळ याचबरोबर बेळगावात प्रादेशिक आयुक्त कार्यालय आहे. जवळपास दीड लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यांना पीएफसाठी हुबळीला जावे लागत आहे. बेळगावला पीएफ कार्यालय स्थापन करण्यास 2011 पासून राज्य सरकारकडे केंद्र सरकारचा पत्रव्यवहार सुरू आहे. असे असताना अजूनही या ठिकाणी हे कार्यालय स्थापन करण्यात आले नाही. तेंव्हा तातडीने बेळगावात पीएफ व ईएसआय कार्यालये स्थापन करावीत, अशी मागणी द बेलगाम ट्रेडर्स फोरमच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेळगावची औद्योगिक वसाहत मोठी आहे. या ठिकाणी मोठमोठय़ा इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे कामगारांची संख्या देखील अधिक आहे. या सर्वांना पीएफ लागू आहे. याचबरोबर या ठिकाणी अनेक विद्यापीठे आहेत. मोठमोठी कार्यालये आहेत. यामधील सर्व कर्मचाऱयांना पीएफसाठी हुबळीकडे जावे लागत आहे. तेथेही बेळगाव जिह्यासाठी केवळ बुधवार एकच दिवस कामकाजासाठी उपलब्ध केला जात आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱयांना त्याचा फटका बसत आहे.
बेळगावचा समावेश आता स्मार्टसिटीमध्ये झाला आहे. त्यामुळे आणखीनच विस्तार वाढणार आहे. तेंव्हा तातडीने या ठिकाणी पीएफ कार्यालय सुरू करावे. महत्त्वाचे म्हणजे 14 ऑक्टोबर 2014 ला राज्य सरकारला याबाबत केंद्र सरकारने पत्र व्यवहार केला असून यामध्ये स्वतःच्या जागेमध्ये पीएफचे उपप्रादेशिक कार्यालय स्थापन करा, असे म्हटले आहे. असे असताना अजूनही याबाबत राज्य सरकार का पाऊल उचलत नाही? नेमके घोडे कोठे अडकले आहे, असा सवाल देखील यावेळी करण्यात आला.
केंद्र सरकारने याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून राज्य सरकारने मात्र त्याला प्रतिसाद म्हणावा तसा दिला नाही. तेंव्हा तातडीने याची कार्यवाही होऊन या ठिकाणी पीएफ आणि ईएसआय कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास यांनी निवेदन स्वीकारले. याचबरोबर केंद्र विभागाकडे मी पाठपुरावा करीन, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी फोरमचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर यांनी बेळगाव आणि कारवारला एकाचवेळी ही कार्यालये स्थापन करावीत, असा आदेश देण्यात आला होता. कारवारला तातडीने कार्यालय स्थापन झाले. मात्र बेळगावमध्ये अजूनही कार्यालये स्थापन नाहीत, याची माहिती प्रादेशिक आयुक्तांना दिली. त्यावर निश्चितच मी पाठपुरावा करीत, असे त्यांनी सांगितले.
प्रादेशिक आयुक्तांना निवेदन देण्यासाठी सेवंतीलाल शाह, ऍड. एन. आर. लातूर यांच्यासह इतर वकील व कार्यकर्ते उपस्थित होते.









