मृत झालेल्या व्यक्तींच्या घरी नेऊन देत आहेत जेवण : दानशूर मंडळींकडून सहकार्य

वार्ताहर / किणये
कोरोना महामारीच्या संकटामुळे सारेच जण चिंताग्रस्त बनलेले आहेत. बेळगावात सध्या कोरोना व इतर आजारांपासून मृत्यू पावणाऱयांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. तसेच लॉकडाऊन असल्यामुळे एकमेकांच्या घरी जाणेही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना जेवण नेऊन देण्याचे कार्य पिरनवाडी येथील तरुणांनी सुरू केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या उद्देशानेच पिरनवाडी गावातील सकल मराठा समाजातील तरुणांनी हे कार्य शिवजयंतीच्या शुभमुहूर्तापासून सुरू केले आहे. गावातील श्रीराम मंदिरात सकाळी हे कार्यकर्ते भोजन बनवत आहेत. त्यानंतर या भोजनाचे पॅकिंग करून दुचाकीवरून दोघा-चौघांचे गट करून बेळगावातील नागरिकांना घरोघरी जाऊन देत आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांनी निधन झालेल्यांच्या घरातही कोणी जायला तयार नाही. तसेच लॉकडाऊनचे बंधन असल्यामुळे पै-पाहुण्यांना भेटणे दुरापास्त झाले आहे. अशा या परिस्थितीत बेळगावातील मृत झालेल्या व्यक्तींच्या नावाची यादी करून त्यांच्या घरी हे कार्यकर्ते जात आहेत व ज्यांना जेवणाची आवश्यकता आहे, अशांच्या घरी देत आहेत.
पिरनवाडी गावातील काही दानशूर मंडळी स्वतःहून जेवण बनविण्यासाठी त्यांना धान्य, साहित्य व आर्थिक मदत करू लागले आहेत. या उपक्रमामध्ये किरण नेसरकर, नंदू नेसरकर, नारायण मुचंडीकर, विनायक उसुलकर, विनायक उचगावकर, दिनेश मुचंडीकर, मनोहर बिंदले, ओमकार आपटेकर, अभिजीत पेडणेकर, प्रेम येळ्ळूरकर, शुभम माने, चेतन राऊत, सचिन राऊत, प्रकाश मुचंडीकर, विश्वनाथ नेसरकर, गौतम आपटेकर, सर्वेश रामनाथकर आदी परिश्रम घेत आहेत.
‘तरुण भारत’ वृत्तपत्राचा आधार
बेळगावमधील ‘दै. तरुण भारत’ वृत्तपत्रामध्ये रोज प्रसिद्ध होणाऱया सहवेदना या स्तंभामधील मृत्यू झालेल्यांची यादी हे कार्यकर्ते करीत आहेत. त्यानुसार आवश्यकता असणाऱयांना संपर्क साधून त्यांच्यापर्यंत जेवणाची पाकिटे पोहोचवत आहेत. ‘तरुण भारत’ या सहवेदना सदराचा आपल्याला समाजसेवा करण्यासाठी असाही उपयोग होत असून या कार्यकर्त्यांनी ‘तरुण भारत’ वृत्तपत्राबद्दल व त्यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.









