वार्ताहर/ किणये
पिरनवाडीत क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा गुरुवारी मध्यरात्री उभारला असल्याने शुक्रवारी दिवसभर पिरनवाडी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याला विरोध करत मराठी भाषिक व शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. तणावसदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला होता. अखेर शुक्रवारी रात्री दोन्ही समाजाच्या प्रमुख पंचांची बैठक घेऊन या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला.
राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर आदींनी दोन्ही समाजातील लोकांची बैठक पिरनवाडीतील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे बोलाविली होती. सखोल चर्चेनंतर मार्ग काढण्यात आला. संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारलेल्या जागी राहणार असून पूर्वीप्रमाणेच पिरनवाडीतील या चौकाला ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ हे नाव अबाधित राहणार असल्याचे ठरविण्यात आले.
शुक्रवारी दिवसभर पिरनवाडीतील पुतळा प्रकरणासंदर्भात बेळगाव शहरासह राज्यातही वातावरण गढूळ झाले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी शांततेसाठी उपाययोजना करण्याचे बेळगावच्या जिल्हाधिकाऱयांना सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा प्रशासनाचे अधिकारी व ग्रामस्थांची बैठक घेऊन तोडगा काढण्यात आला.
शनिवारी सकाळी राज्याचे पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा, बेळगाव जिल्हय़ाचे पालकमंत्री व राज्याचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आदींनी पिरनवाडीला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा या दोन्ही थोर पुरुषांच्या पुतळय़ांना पुष्पहार अर्पण करून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.









