बचावाकरता प्रियांका वड्रांपासून जयराम रमेश सरसावले : भाजपकडून जोरदार लक्ष्य : वारसा करासंबंधीचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांच्या वारसा कराविषयीच्या वक्तव्यावरून देशभरात राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. पित्रोदा यांच्या टिप्पणीमुळे काँग्रेसला बॅकफूटवर यावे लागले आहे. याचमुळे पक्षाने पित्रोदा यांच्या टिप्पणीपासून अंग झटकले आहे. तर दुसरीकडे पित्रोदांच्या टिप्पणीचा दाखला देत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेस आता देशात वारसा कर लागू करून लोकांच्या वडिलोपार्जित मिळकतीचा निम्मा हिस्सा हिरावून घेत पाहत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. वारसा कराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे.
पित्रोदा यांच्या टिप्पणीमुळे मोठा वाद उभा ठाकल्यावर काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. लोकांसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होत नाही, तर निरर्थक मुद्द्यांना विनाकारण महत्त्व दिले जात असल्याचे प्रियांका वड्रा यांनी म्हटले आहे. देशात एक राज्यघटना आहे, वारसा कर लागू करण्याची आमची कुठलीच योजना नाही असे स्पष्टीकरण देत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
पित्रोदांच्या विचाराशी काँग्रेस असहमत
सॅम पित्रोदा यांचे विचार नेहमी काँग्रेस पक्षाचे विचार दर्शवित नाहीत. अनेकदा त्यांचे विचार म्हणजे काँग्रेसची अधिकृत भूमिका नसते. पित्रोदा यांच्या टिप्पणींना खळबळजनक स्वरुप देणे आणि संदर्भ सोडून त्यांचा राजकीय वापर करण्याचे कृत्य भाजपकडून करण्यात आले आहे. भाजप याच्या माध्यमातून मूळ मुद्द्यांना बगल देऊ पाहत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींकडून लक्ष्य
लोकसभा निवडणुकीच्या काळात पित्रोदा यांच्या टिप्पणीवरून भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ज्या लोकांनी पूर्ण काँग्रेस पक्षाला वडिलोपार्जित संपत्ती मानून स्वत:च्या मुलांना दिला, ते आता सामान्य भारतीयांनी स्वत:च्या मुलांना संपत्ती देऊ नये असे इच्छित आहे. काँग्रेस आता आई-वडिलांकडून प्राप्त संपत्तीवरही कर लादू पाहत आहे. ‘काँग्रेसची लूट, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ हाच त्याचा मंत्र असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
पित्रोदा यांची टिप्पणी
भारतात वारसा कर लागू करण्यावर चर्चा व्हायला हवी. अमेरिकेत वारसा कर आकारण्यात येतो. जर कुणाकडे 10 कोटी डॉलर्सची संपत्ती असेल, तर त्याच्या निधनानंतर 45 टक्के संपत्ती त्याच्या मुलांना मिळते, तर 55 टक्के संपत्तीवर सरकारचा मालकी हक्क होतो असे पित्रोदा यांनी म्हटले होते.
काँग्रेसचा खरा चेहरा समोर
सॅम पित्रोदा यांच्या टिप्पणीमुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. सर्वप्रथम काँग्रेसच्या घोषणापत्रात सर्वेक्षणाचा उल्लेख, देशाच्या संपदेवर अल्पसंख्याकांवर पहिला अधिकार असल्याचे मनमोहन सिंह यांचे जुने वक्तव्य आणि आता पित्रोदा यांनी अमेरिकेप्रमाणे भारतात संपत्तीचे वाटप व्हावे असे म्हणणे हे सर्वप्रकार पाहता काँग्रेसचा दुष्ट हेतू उघड होत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. काँग्रेस लोकांच्या वैयक्तिक संपत्तीचे सर्वेक्षण करत तिला सरकारी संपत्ती ठरविण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावाही त्यांनी केला.
पित्रोदा यांच्याकडूनही स्पष्टीकरण
माझ्या टिप्पणीचा विपर्यास करण्यात आला आहे. 55 टक्के संपत्ती हिरावून घेतली जाईल असे कुणी म्हटले होते? भारतात वारसा कर लागू करा अशी मागणीही करण्यात आली नव्हती. वारसा करासाठी मी केवळ अमेरिकेचे उदाहरण दिले होते. काँग्रेसचा माझ्या टिप्पणीशी कुठलेच देणेघेणे नाही असे स्पष्टीकरण सॅम पित्रोदा यांनी दिले आहे.








