आनंद गावडे यांची कल्पकता : दुचाकी बनलीय लक्षवेधी
पद्माकर वालावलकर / कुडाळ:
तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसीत होत आहे. या स्पर्धेच्या युगात कार-दुचाकी निर्मिती करणाऱया कंपन्याही मागे नाहीत. त्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या मॉडेलमध्ये विलक्षण बदल करून बाजारात आणत आहेत. इलेक्ट्रिक मोपेड दुचाकी सध्या आकर्षण ठरत आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्गातील एका तरुणाने आपल्या कौशल्याने ई-रिक्षा किट, मोटर व बॅटरीची जोडणी करून इलेक्ट्रिकवर चालणारी गिअर दुचाकी बनविली. सध्या ती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
यासाठीची बॅटरी त्याने साहित्य आणून स्वतः बांधली. तो तरुण आहे, कुडाळ तालुक्मयातील पिगुळी-शेटकरवाडी येथील आनंद भरत गावडे. तंत्रज्ञानाबाबत आनंद याला लहानपणापासूनच आवड. इलेक्ट्रिशियन होण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यामुळे बारावीनंतर त्याने ओरोस येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इलेक्ट्रिशियनचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला.
नगरला महावितरण कंपनीत इलेक्ट्रिक ऑपरेटर
सन 2014 मध्ये तो नगर येथे महावितरण कंपनीत इलेक्ट्रिक ऑपरेटर म्हणून सेवेत रुजू झाला. तेथून बदली होऊन तो सध्या सावंतवाडी येथे सबस्टेशनला ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. त्याची सेवा तंत्रज्ञानाशी निगडित आहेच. शिवाय त्याला त्याविषयी आकर्षण असल्याने बाजारात आलेली एखादी इलेक्ट्रिक वस्तू त्याच्या नजरेतून सुटली नाही. त्या वस्तूचे बारकाईने निरीक्षण करणे, त्यातील बदल जाणून घेणे, ही त्याची आवड आहे.
इलेक्ट्रिक मोपेड दुचाकीने दिली प्रेरणा
अलिकडेच बाजारात इलेक्ट्रिकवर चालणारी मोपेड दुचाकी आली. ती रस्त्यावरून धावताना लक्षवेधी ठरत आहे. आपल्या चिकित्सक बुद्धीने तांत्रिक बाबी हाताळणाऱया गावडे यांच्या नजरेतून ती दुचाकी सुटणे अशक्मयच होते. ती कशी बनवली आहे, त्यात काय बदल केले, याचा अभ्यास त्यांनी केला. त्याचवेळी मोपेड इलेक्ट्रिकवर चालू शकते, तर गिअरची दुचाकी का चालू शकणार नाही?, हा विचार त्यांच्या मनात आला.
बॅटरी स्वत:च बांधली
त्यांच्याजवळ एक सेकंड हँड दुचाकी आहे. तिलाच इलेक्ट्रिकवर करण्याची कल्पना त्यांच्या डोक्मयात आली. ही कल्पना त्यांनी मित्रांना बोलून दाखविली. त्यांनीही सहकार्याची हमी देत त्यांना प्रोत्साहन दिले. त्यासाठीची बॅटरी विकत घेतली, तर जादा रक्कम मोजावी लागणार आहे. त्यापेक्षा आपणाला हवी तशी स्वतः बांधल्यास ती दर्जेदार होईल आणि खर्चही कमी येईल, या विचाराने त्यांनी बॅटरीसाठी आवश्यक साहित्य विकत आणले. अवघ्या दोन दिवसांत ती बांधून पूर्ण केली.
गिअर दुचाकी इलेक्ट्रिकवर करण्यात यशस्वी
एक हजार वॅटच्या मोटरसह येणारे ई-रिक्षा किट त्यांनी विकत आणले. 48 होल्टची बॅटरी, किट व मोटरच्या सहाय्याने जोडणी करून गिअर दुचाकी इलेक्ट्रिकवर करण्यात ते यशस्वी झाले. कुठल्याच कंपनीने गिअर दुचाकीचे इलेक्ट्रिकवर चालणारे मॉडेल अद्याप बाजारात आणलेले नाही. सिंधुदुर्गातील या तरुणाने आपल्या कल्पकतेने हा प्रयोग केला. त्याची मेहनत फळाला आली. त्यांनी बनविलेली ही गिअर दुचाकी रस्त्यावरून धावताना नाविन्य जाणवते. ती लक्षवेधी ठरत आहे.
किटमुळे रिमोटची सेन्सर सुविधाही
या दुचाकीला बसविलेल्या किटमुळे रिमोटची सेन्सर सुविधाही आहे. इलेक्ट्रिक दुचाकी सुरू असताना रिव्हर्स (मागे) घेता येते. त्याचप्रमाणे ही दुचाकीही रिव्हर्स घेण्याची सिस्टीम आहे.
तांत्रिक कलेला चालना देण्याचा उद्देश!
इलेक्ट्रिकवर करण्यासाठी 35 हजार रु. खर्च आला. तीन तास बॅटरी चार्ज केल्यानंतर साधारण पन्नास किमी. पर्यंत जाण्याची क्षमता सध्या तरी आहे. 40- 45 वेगाने सहज चालते. याकामी आपल्याला कुडाळ येथील श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिकल्सचे कैलास परब या मित्राचे सहकार्य मिळाले. दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोलचे दर परवडणारे नाहीत. या इलेक्ट्रिक दुचाकीमुळे पेट्रोलचा खर्च कमी झाल्याने पैशांची बचत होते. तसेच नवीन काही शिकता यावे, आपल्या अंगी असलेल्या तांत्रिक कलेला चालना मिळावी, या उद्देशाने हा प्रयत्न केला, असे ते सांगतात.









