पारंपरिक लग्नात तीनचारशे पाहुणे आलेले असतात. भरपूर गर्दी असते. मंगलाष्टके सुरू होतात तेव्हा दर्दी खवय्या असलेला अभ्यागत गर्दीच्या थोडा मागे उभा असतो. मंगलाष्टके चालू असताना हातातील अक्षता तो फेकल्यासारखं करतो. पण त्या अक्षता दोन तीन फुटांपलीकडे पोचत नाहीत. मंगलाष्टके संपली आणि वधूवरांनी एकमेकांना हार घातले की एक दोन क्षण गलका उडतो. वधू आणि वर कपडे बदलून किंवा तसेच एका शोभिवंत आसनावर बसून अभ्यागतांच्या शुभेच्छा (आणि काही वेळा अहेर) स्वीकारायला सज्ज होतात. खवय्या अभ्यागत या वेळी गर्दीच्या मागे असतो. माईकवरून होणाऱया आयोजकांच्या लोकप्रिय घोषणेची वाट बघत असतो. ती घोषणा म्हणजे “अमुक हॉलमध्ये स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे. पाहुण्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही नम्र विनंती.’’
खवय्या अभ्यागत ही घोषणा ऐकल्यावर भोजनगृहाकडे धावतो. तो एकटा नसतोच. गर्दीतला मागचा एक मोठा तुकडा थेट भोजनगृहाकडे जातो. मधला तुकडा आधी जेवायला जावे की आधी वधूवरांना शुभेच्छा आणि अहेर द्यावेत या द्विधा स्थितीत असतो. पुढच्या तुकडय़ातील लोकांना पर्याय नसतो. ते वधूवरांना भेटण्यासाठी रांगेत उभे राहतात.
कोरोनामुळे सगळेच चित्र बदलले आहे. लोकांना गर्दी करू द्यायला सरकार तयार नाही आणि शहाणी माणसे गर्दीत जायला धजत नाहीत. लग्नाला जास्तीत जास्त 40 लोकांनी हजर रहावे असा नवा दंडक आला आहे. यात वधू-वर मोजले आहेत की नाही हे ठाऊक नाही!
आज ना उद्या कोरोनाची ही लाट ओसरेल. पण नंतर तिसऱया लाटेची शक्मयता आहे. आणि देशात लशींची अभूतपूर्व टंचाई आहे. हे लक्षात घेता पुढच्या काळात काही वेगळे बदल घडू शकतात. निमंत्रण पत्रिकेवर लग्नाच्या मुहूर्ताची वेळ छापल्यावर त्याखाली स्नेहभोजनाऐवजी लसीकरणाची वेळ छापली जाईल. त्याखाली ‘कृपया अहेर आणू नयेत. आपले आधार कार्ड जवळ ठेवावे.’ असा काहीसा मजकूर असेल.
मंगलाष्टके झाल्यावर घोषणा होऊ शकेल, ‘वरच्या मजल्यावर लशीचा पहिला आणि दुसरा डोस देण्याची व्यवस्था केली आहे. लस घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी पाहुण्यांना नम्र विनंती आहे.’ मानाच्या पंक्तीत वधूकडचे लोक किंवा स्वतः वधूवर जिलबीचं ताट घेऊन आग्रह करीत फिरतात तसे या लग्नानंतर हातात सिरिंज घेऊन आग्रह करताना देखील दिसतील!








