वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी दिल्लीमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षनेत्यांनी पासवान कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव बिहारमध्ये नेत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी रात्री बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष रामविलास पासवान यांचे निधन झाले. पासवान यांच्यावर गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर नुकतीच हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती.
रामविलास पासवान यांनी आठवेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधीत्व केले. ते सध्या राज्यसभेतून खासदार होते. त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षातून राजकारणाचे धडे गिरवले. ते 1969 साली पहिल्यांदा बिहार विधानसभेवर निवडून गेले होते. 1975 मध्ये आणीबाणीला विरोध केल्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. जनता पार्टीच्या तिकिटावर 1977 साली त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांनी 1980, 1989, 1996, 1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये लोकसभेमध्ये बिहारचे प्रतिनिधीत्व केले. राम विलास पासवान यांनी 2000 साली लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली होती.