विटा / प्रतिनिधी
लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या लेंगरेच्या यात्रेवर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पाणी फेरले. शेकडो छोट्या व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. मात्र अवघ्या एका रात्रीत पुन्हा पाले उभा करीत लेंगरेचा उरूस पार पडत आहे. चिखलात घोटाभर पाय बुडत असताना रात्रभर मेहनत करीत जिद्दीने लेंगरेकर निसर्गाच्या संकटावर पाय देऊन उभा राहिला. पहाटेच्या वेळी संदलची शाही मिरवणूक दिमाखात निघाली. लालशहाबाज कलंदर बाबांच्या नावाचा जयघोष करीत मानाचे गाढे देवाच्या टेकडीवर उत्साहात दाखल झाले. एकुणच एका रात्रीत पुन्हा उरूस उभा करणाऱ्या लेंगरेकरांच्या श्रद्धेला आणि जिद्दीला सलाम करावा लागेल.
खानापूर तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या लेंगरेचा उरूस म्हणजे कलाकारांसाठी पर्वणी. भेदीक ते तमाशापर्यंत सर्व कलांना आश्रय देणाऱ्या लेंगरे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पहाटेच्या वेळी निघणारी शाही मिरवणूक आणि कलंदर बाबांच्या टेकडीला पळणारे मानाचे गाहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी पळणारे गाडे, कुस्त्या पाहण्यासाठी लाखो भाविक गावात दाखल झाले आहेत. मात्र शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पावसाने अक्षरश: हाहाकार केला. वादळी बारे आणि गारांसह मुसळधार पावसाने तब्बल दोन तास हजेरी लावली. सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
यात्रेसाठी परिसरातील दोन-तीन जिल्ह्यातून छोटे व्यापारी पाल घेऊन आले होते. मात्र पावसाचा कहर झाला आणि नैसर्गिक संकटापुढे माणूस हतबल झाला. अशातच दुपारपासून बीज गायब झाली. जरूसातील मुख्य कार्यक्रम रात्रभर चालत असताना बीजच गायब असल्याने अनेकांना कोडे पडले. शेकडो लोकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. मात्र हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या लेंगरेच्या पाढरीतील माणूस डगमगला नाही. यात्रा कमेटी पहत्या पावसात कामाला लागली. अध्यक्ष मधुकर पाटील, मच्छिंद्र पाटील यांनी गावातील तरुणांना सोबत घेत छोट्या व्यापाऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. सरपंच राधिका बागल यांनी तहसिलदारांशी संवाद साधत पंचनाम्याची मागणी केली.
पालात पाणी घुसल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अनेकांनी गाड्यात माल भरण्यास सुरूवात केली होती. मात्र ग्रामस्थांनी व्यवसायिकांना धीर दिला. रात्रीच्या जेवणाची काळजी करू नका, तुम्ही स्टॉल उभा करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हे शब्द आश्वस्त करणारे होते. त्यानंतर व्यापारी देखिल कामाला लागले. शनिवारी दुपारपर्यंत पुन्हा पाले उभा राहिली आणि संकटाच्या अंधारावर उगवत्या सूर्याच्या साक्षीने व्यवसायिकांनी मात केली.
रात्रीच्या पावसाने दर्ग्यावर देखिल पाणी पाणी झाले होते. मात्र रात्रीत स्वच्छता करीत मानाचा गलफ आणि चादर येण्याच्या वेळेपूर्वीच पुन्हा दर्गाह चकाचक झाला होता. पहाटेच्या वेळी लालशहाबाज कलंदर बाबांच्या नावाचा जयघोष करीत मानाचा गलफ मच्छिंद्र पाटील, शमशुद्दीन पिरजादे आदी मानकऱ्यांसह देवाच्या टेकडीवर पोहचले. कालच्या पावसानंतर अशक्य वाटणारे काम देवावरी श्रद्धा आणि ग्रामस्थांच्या जिद्दीने तडीला गेले.