प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले होते. ते बुजवण्यासाठी पालिकेने पाच टेंडर काढली. दहा लाख रुपयांचा निधी त्याकरता राखीव ठेवण्यात आला होता. त्यामधून हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र, ते खड्डे मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरुपात बुजवल्याने काही खड्डे पुन्हा उखडले आहेत.
शहरात पालिका दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी राखीव निधी ठेवते. त्याच निधीतून रस्त्याचे पॅचिंग केले जातात. ते पॅचिंग करण्यासाठी पावसाळयातील पॅचिंग करण्यासाठी जी यंत्रणा असते, ती मात्र यावर्षी वापरली गेली नाही. पावसाळय़ात शहरातील रस्त्याच्या झालेल्या नुकसानीनंतर ते रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेच्यावतीने दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातुन गेल्या आठवडयात खड्डे बुजवले गेले. हे खड्डे मुजवताना मुरुमाचा वापर करण्यात आला. त्यामध्ये शाहु चौक ते चार भिंती रोड, समर्थ मंदिर ते राजवाडा, समर्थ मंदिर ते शाहु चौक आदी रस्त्यांचा समावेश होता. बुजवण्यात आलेले हे खड्डे ऊन पडल्यामुळे उखडू लागले आहेत. त्यामुळे पालिकेचे दहा लाख गेले खड्डयात अशीच परिस्थिती सध्या शहरात दिसत आहे.









