प्रतिनिधी/ सातारा
पालिकेतले लाच प्रकरण गाजल्यानंतर कुठेही संशयाची जागा होवू नये म्हणून काही फाईल पालिकेतून स्वतःहूनच बाहेर पडत असल्याचे चित्र तब्बल दोन वेळा साताकरांना दृष्टीस पडले. त्यामुळे पालिकेच्या फाईलींना पाय फुटू लागले आहेत. नेमक्या पालिकेबाहेर गेलेल्या फाईली जातात कुठे?, त्याचे होते काय असा सवाल होवू लागला आहे. दरम्यान, पालिकेबाहेर ऑफिस संपल्यानंतर फाईली बाहेर नेण्याचा कोण सल्ला देत आहे याचीच चर्चा होत आहे.
लाच प्रकरणाने चांगलाच वणवा लागला आहे. त्या वणवामध्ये आणखी कुठे पेट घेवू नये म्हणून काही जाणकारांनी जेथे जेथे त्रुटी आहेत त्या त्या फाईली गायब करण्याचा सल्ला दिल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे पालिकेतून तब्बल दुसऱयांदा ऑफिस सुटल्यानंतर पालिकेचे शटर डाऊन झाल्यानंतर अर्धे शटर उचलून पालिकेतून फाईली बाहेर येतात कशा?, गाडीवर टाकल्या जातात अन् तेथून त्या गायब होतात. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. त्यामुळे नेमक्या त्या फाईली कोणत्या विभागातील होत्या. काहींनी त्या फाईलीवर अनुसूचित जाती जमाती असे काहीतरी लिहिल्याचे वाचले आहे, असे सांगितले. दरम्यान, या फाईली बाहेर नेवून नेमके काय साध्य झाले. त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरु आहे. पदाधिकाऱयांना यातील माहिती आहे काय?, असाही सवाल उपस्थित होत आहे.








