प्रतिनिधी/ रत्नागिरी
पालघर जिह्यात दोन साधू व त्यांच्या वाहनचालकाची जमावाने हत्या केली. घटनास्थळी उपस्थित असताना व साधूंनी संरक्षणाची याचना केली असताना त्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न करणाऱया पोलीस कर्मचाऱयांना या प्रकरणात आरोपी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांन केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आवाज उठवल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घटना गैरसमजातून घडली व हे हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. या हत्याकांडावर पांघरूण घालण्याच्या प्रयत्नाचा निषेध करत असल्याचे ऍड. पटवर्धन म्हणाले. या घटनांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी तसेच मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा, या घटनांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ऍड. पटवर्धन यांनी केली.
कोविडमध्ये पतसंस्था योगदान देणार
कोविड 19 मुळे लॉकडाऊन स्थितीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना आवश्यक मदत कार्यात सर्व पतसंस्था योगदान देण्याचा निर्धार रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात फेडरेशन आणि सहकार खात्याच्या विद्यमाने तातडीने बैठक सोशल डिस्टन्सची तत्त्वे पाळत झाली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी या वेळी उपस्थित होते. रत्नागिरीतील 27 पतसंस्थांचे प्रतिनिधी आले होते. शिववैभव पतसंस्थेचे संतोष थेराडे यांनी 25 हजार रुपयांचा धनादेश डॉ. मुंढे यांच्याकडे सुपूर्त केला.
डॉ. मुंढे यांनी सांगितले, सर्व पतसंस्थांना कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. पतसंस्थांनी गरजू, अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी कायद्याच्या चौकटीत राहात योगदान द्यावे. सामाजिक बांधिलकी सांभाळत पतसंस्था भरीव योगदान देतील, असा विश्वास ऍड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. गार्डी यांनी पतसंस्थांनी अडचणीची स्थिती लक्षात घेऊन योग्य योगदान द्यावे, असे आवाहन केले.









