काँग्रेस शहराध्यक्षांचा इशारा- उजनीचे पाणी इंदापूरला नेण्यास तीव्र विरोध
प्रतिनिधी / सोलापूर
ब्रिटिशांविरुद्ध लढलेले हे सोलापूर आहे, सर्वात आधी स्वतंत्र होणारा सोलापूर आहे. आम्ही अन्याय कधीही खपून घेत नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूरकरांच्या नादी लागू नये. सोलापूरचा हक्काचे पाणी घेतले तर काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असाच इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
गुरुवारी दुपारी काँग्रेस भवनात काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाले बोलत होते. उजनीचे पाणी पळविण्याच्या कोणत्याही निर्णयाला सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसचा तीव्र विरोध असेल. सिव्हील हॉस्पिटल येथे ज्ये÷ नागरिक बाबा मिस्त्री यांना पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक ओळख न दाखविणे, तेथील अधिकाऱयांना सांगून अडविणे ही कृती निषेधार्थ आहे, असेही वाले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद देऊन सोलापूरचे पालकमंत्री करावे, अशी मागणी केली.
या पत्रकार परिषदेस गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक विनोद भोसले, शहर युवक अध्यक्ष बाबा करगुळे आदी उपस्थित होते.