वैभववाडीनजीक ट्रकवरील ट्रॉलीला बसली ट्रेनची धडक : कामगार बाजूला गेल्याने बचावले
कणकवली:
कोकण रेल्वे मार्गावरून ओखा ते थिरुवनंतपूरम सेंट्रल अशा जात असलेल्या ‘पार्सल ट्रेन’ची विद्युतीकरणाच्या कामासाठी ‘ट्रक’वर असलेल्या ट्रॉलीला जोरदार धडक बसली. या धडकेत सुदैवाने काम करत असलेले कामगार वेळीच ‘ट्रक’वरून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना वैभववाडी ते राजापूर रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. मात्र, ट्रकवर काम सुरू असल्याबाबत नजीकच्या स्थानकांना, ‘पार्सल ट्रेन’च्या मोटरमनला का कल्पना नव्हती, असा सवाल उपस्थित होत आहे.
‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर सध्या प्रवासी रेल्वेगाडय़ा बंद आहेत. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, आंबा व तत्सम फळे इतरत्र पोहोचविता यावीत, या उद्देशाने पार्सल ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावत असलेली ओखा – थिरुवनंतपूरम (00933) ही ‘पार्सल ट्रेन’ रत्नागिरीहून कणकवलीच्या दिशेने येत होती. नेमक्या याच सुमारास वैभववाडी रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर ‘ट्रक’वरच विद्युतीकरणाचे काम सुरू होते. यासाठी काही कामगार काम करत असतानाच या कामासाठी ‘ट्रक’वर एक ट्रॉलीही होती.
दरम्यान, ही ‘पार्सल ट्रेन’ भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून ‘ट्रक’वरील कामगारांनी धूमच ठोकली. मात्र, त्यांना ‘ट्रॉली’ बाजूला करणे शक्य झाले नाही. परिणामी ‘पार्सल ट्रेन’ची थेट ट्रॉलीला धडक बसली. या घटनेनंतर रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी आले. ट्रॉलीला धडक बसल्याने ‘पार्सल ट्रेन’च्या इंजिनातही बिघाड झाला. त्यामुळे ट्रेन तेथेच थांबवावी लागली. पुढे अन्य स्थानकावरून इंजिन आणून ते ‘पार्सल ट्रेन’ला जोडण्यात आले. त्यानंतर जवळपास दोन तासांनी ट्रेन घटनास्थळावरून मार्गस्थ झाली. परिणामी विलंबाने धावत असलेली ही ‘पार्सल ट्रेन’ कणकवली स्थानकात सायंकाळी 5.23 वाजता दाखल झाली होती.
विद्युतीकरणाचे काम होते सुरू!
दरम्यान, ‘ट्रक’वरील विद्युतीकरणाचे काम खासगी कंपनी करत आहे. मात्र, बुधवारी तेथे विद्युतीकरणाचे काम करत असल्याबाबत या कंपनीने कोकण रेल्वेला कोणतीही कल्पना दिली नव्हती. परिणामी हा अपघात घडला. अपघातात अन्य कोणतेही नुकसान झालेले नाही. मात्र, अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱयांनी दिली.









