3 किंवा 5 ऑगस्टला राममंदिराचे भूमिपूजन : ट्रस्टच्या बैठकीत निर्णय : प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला
अयोध्या, नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीच्या तारखेविषयी शनिवारी ट्रस्टच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. प्राथमिक चर्चेनुसार 3 किंवा 5 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून त्यासंबंधीचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. ‘पीएमओ’कडून यापैकी एका तारखेवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पायाभरणीच्या तारखेबरोबरच मंदिराच्या स्वरुपावरही चर्चा करण्यात आली. त्यानुसार उंची 161 फूट करण्याचा निर्णय झाला असून मंदिरावर तीनऐवजी पाच घुमट साकारण्यावर एकमत झाल्याचे समजते.
अयोध्येत शनिवारी झालेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीस राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह 12 सदस्यांनी हजेरी लावली. अन्य तीन सदस्य व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीत मुख्यत्वेकरून मंदिर पायाभरणीच्या तारखेवर आणि रचनेवर अधिक चर्चा झाली. बैठकीनंतर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांनी पंतप्रधानांना अयोध्या दौऱयासाठी आमंत्रणपत्र पाठवले आहे.
तीन-साडेतीन वर्षात बांधकाम पूर्ण करणार
पावसाळय़ानंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर मंदिर बांधणीत आर्थिक मदतीसाठी देशातील वेगवेगळय़ा भागातील 10 कोटी कुटुंबांशी संपर्क साधला जाणार असल्याचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. निधी जमा झाल्यानंतर आणि मंदिर बांधकामाशी संबंधित सर्व रेखांकन पूर्ण झाल्यानंतर तीन ते साडेतीन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या उपस्थितीसाठी आग्रह
श्रावण महिना हा पवित्र समजला जातो. याच महिन्यात भूमिपूजन व्हावे असा ट्रस्टचा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या हस्तेच भूमिपूजन व्हावे अशी ट्रस्टच्या सर्व सदस्यांची इच्छा दिसून आली. मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होईल. पंतप्रधानांनी लवकरच येथे येऊन बांधकाम सुरू करावे अशी संतांची मागणी आहे. ते आधीच येणार होते पण कोरोना संकटामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडल्याचे महंत कमलनयन दास यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. तत्पूर्वी बैठकीमध्ये बाबरी मशीद पक्षाचे वकील असलेले इक्बाल अन्सारी यांनीही आपण पंतप्रधानांचे अयोध्येत स्वागत करू इच्छित असल्याचे स्पष्ट केले.









