ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलीवुड अभिनेत्री पायल घोष हीने फिल्म दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करत मुंबई पोलीसमध्ये तक्रार केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता अनुराग कश्यपला समन्स बजावले असून त्याला उद्या सकाळी 11 वाजता मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.

अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करावी, असे ट्विट पायल ने केले होते.
तसेच अनुराग कश्यपवर कारवाई झाली नाही तर मी उपोषण करेन अशी धमकी देखील पायलने पोलिसांना दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यपला उद्या पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्या संदर्भात समन्स बजावण्यात आला आहे.
दरम्यान, जे आरोप माझ्यावर करण्यात आले आहेत ते अर्थहीन असल्याचे अनुराग कश्यपने यापूर्वीच सांगितले आहे.









