एलऍण्डटीकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर : उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याच्या मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. सध्या शहर आणि उपनगरात पाच दिवसाआड तसेच काही भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी असलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी एलऍण्डटी कंपनीचा आटापिटा सुरू आहे. त्यामुळे मागील 15 दिवसात शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे.
24 तास पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून शहरात एलऍण्डटी कंपनीकडून पाणीपुरवठा आणि देखभाल करण्यात येत आहे. मात्र पाणीपुरवठा नियोजन व्यवस्थित नसल्याने मागील 8 महिन्यात शहरवासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागले. जलाशयात मुबलक पाणीसाठा असूनही शहरवासियांना 15 ते 20 दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. विद्युत पुरवठा खंडित आणि जलवाहिन्यांच्या गळत्यामुळे सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी शहरवासियांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. हिडकल जलवाहिनी आणि हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीचे काम निघाल्याने सातत्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली होती. अशा विविध समस्या पाणीपुरवठा नियोजनात निर्माण झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
निर्माण झालेल्या समस्या पाहता उन्हाळय़ात सुरळीत पाणी मिळणार का? असा प्रश्न शहरवासियांसमोर निर्माण झाला होता. मात्र एलऍण्डटी कंपनीकडून पाणीपुरवठा नियोजनासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सध्या काही भागात चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसात शहरवासियांना पाणी समस्येची झळ भासली नाही.
मागील 8 महिन्यात निर्माण झालेली पाणीपुरवठा नियोजनाची स्थिती पाहता मे महिन्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी एलऍण्डटीकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









