देव भक्ताच्या अधीन असतो. कृष्णाच्या मनात होते की देवकी माता, भगिनी सुभद्रा यांच्या समक्ष मोठा समारंभ करून रुक्मिणीशी विवाह करावा. तसेच भिमकीच्याही मनात होते की सर्वांगाला समारंभपूर्वक हळद लावावी, बोहल्यावर चढून विधीपूर्वक आपला विवाह व्हावा. दोघांच्याही मनाप्रमाणेच आता भीष्मक राजा कृष्णाला विधिपूर्वक कन्यादान करण्याची विनंती करत होता. कृष्ण भीष्मक राजाला म्हणाला-आपली विनंती आपण आमचे ज्ये÷ बंधू बलरामदादा यांच्याकडे करावी. आम्ही दादांच्या आज्ञेचे पालन करू. कृष्णाच्या सूचनेप्रमाणे भीष्मकाने बलरामदादांना वंदन करून रुक्मिणी कृष्णाच्या विधिपूर्वक लग्नाविषयी आपली विनंती केली. बलरामदादांनी हसत याला मान्यता दिली व भीष्मकाचा आदरपूर्वक सत्कार केला.
राजा म्हणे गा श्रीहरी । माझा आश्रम पवित्र करिं ।
आपुल्या दासातें उद्धरिं । कौंडिण्यपुरिं त्वां यावें ।
भीमकी म्हणे ऐक ताता । भाग्ये पावलासी कृष्णनाथा । मागें सरों नको सर्वथा । गृहममता सांडावी । सर्व सामग्री जीवेंभावेंसी । आवडीं आणावीं कृष्णापाशीं । भावें पूजिल्या हृषीकेशी । सकळ कुळासी उद्धार । वचना मानवला बळिदेवो। ऐकोनि हांसिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो। मुळींचा ठावो लग्नासी । भीमक म्हणे कळलें बीज। कृष्णपूजनें आमुचें काज । धन्य धन्य माझी आत्मज। श्रीकृष्ण निजबीज पावली । इच्या वचनाचें महिमान। पाहतां बुडोनि ठेलें मन । वचनें पळविला अभिमान। मीतूंपण उडविलें । बाप माझें भाग्य थोर। कृष्ण परब्रह्म साचार । भीमकीयोगें चराचर । ब्रह्माकार पै जाले ।
अवचटें श्रीकृष्णचरणी । वंशींचें विनटलिया कोणी । तोचि सकळ कुळातें तारुनी । परब्रह्मभुवनी नांदवी । ऐशा सुखाचेनि हरिखे। राजा बोलिला निजमुखें । वचन भीमकीचें कौतुक। अवश्यक मानिलें। रुक्मिणीचा पिता भीष्मक राजा श्रीकृष्णाला म्हणाला – हे श्रीहरी! माझे घर पवित्र कर. आपल्या या दासाचा उद्धार कर. आपण सहपरिवार कुंडिनपुरात या. त्यावेळी रुक्मिणी आपल्या वडीलांना म्हणाली – बाबा! आपल्या भाग्याने आपल्याला श्रीकृष्णाची प्राप्ती झाली आहे. आता माघारी फिरू नका. घरादाराची ममता सोडून द्या. सर्व सामग्री इथेच आणून श्रीकृष्णाची सद्भावनेने पूजा करा. त्यामुळे आपल्या सगळय़ा कुळाचाच उद्धार होईल. रुक्मिणीचे म्हणणे बलरामदादा व कृष्णालाही पसंत पडले. मूळमाधव क्षेत्री हा विवाह करावा असे सर्वांच्या संमतीने ठरले. भीष्मक राजा म्हणाला – आपल्या सर्वांची इच्छा मला मान्य आहे. श्रीकृष्णाचे पूजन करणे हीच आमची मुख्य इच्छा आहे. रुक्मिणी सारखी कन्या मला लाभली हे माझे मोठेच भाग्य होय. हिचे बोलणे एवढे श्रे÷ आहे की ते ऐकून माझे चित्त कृष्ण चरणी लीन झाले. माझा अभिमान नष्ट झाला. माझ्या मनातील मी-तूपण नाहीसे झाले. माझे भाग्य किती थोर की ज्यामुळे मला परब्रह्माची प्राप्ती झाली.
Ad. देवदत्त परुळेकर