केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचे कुडचडेतील कार्यक्रमात प्रतिपादन
वार्ताहर/ केपे
पाणथळ प्रदेश म्हणजे आमच्या दृष्टीने ‘इको-टुरिझम’ असून त्यामुळे स्थानिक पातळीवर नवीन रोजगारनिर्मितीची आणि ग्रामीण भागांतील लोकांना उत्पन्न कमावण्याची संधी मिळू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. कुडचडे येथील नंदा तळय़ाचा देशातील 75 रामसर पाणथळ प्रदेशांत समावेश केलेला असून त्यासंबंधीच्या फलकाचे तळय़ाच्या ठिकाणी अनावरण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण मंत्रालयातर्फे जागतिक पाणथळ दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम कुडचडे रवींद्र भवन येथे झाला.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, कुडचडे नगराध्यक्षा डॉ. जस्मिन ब्रागांझा, सुजित वाजपेयी, अरुण मिश्रा आदी मान्यवर हजर होते. गेल्या नऊ वर्षांत केंद्राने विकासाची नवी दिशा निश्चित केली असून तेथे पर्यावरण संवर्धन आणि विकास दोन्ही बरोबर जात आहेत. नऊ वर्षांत देशाचा झालेला आर्थिक विकास व राखण्यात आलेले पर्यावरणीय संतुलन पाहिले, तर अनेक विक्रम मोडून काढले आहेत. असे कोणत्याच देशात झालेले नाही, असे यादव पुढे म्हणाले.
1952 नंतर ज्या प्रजाती नामशेष झाल्या होत्या त्यांचे पुनरुज्जीवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. देशात हरित अर्थसंकल्प आला आहे. विविध क्षेत्रे हरित झाली आहे. त्याअंतर्गत प्रामुख्याने पाणथळ प्रदेशांच्या संवर्धनाला मान्यता मेळाली आहे. आज सर्वांत मोठी गरज ही पाण्याची आहे आणि पाणथळ प्रदेश हे आमच्या सर्व अधिवासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. या पाणथळांमुळे जैवविविधता राखण्यास मदत होते. पर्यावरणीय रचनेचे ते संवर्धन करतात. निर्सगाने दिलेली जैवविविधतेची देणगी जपून ठेवायला हवी. ती आम्हाला औषधे व इतर बाबींकरिता खूपच उपयोगी आहे. निर्सगाने दिलेल्या अशा देणग्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रदूषण कमी करणारे काम करा
देशात पाणथळ प्रदेश मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यांचे स्वरूप कायम ठेवले, तर त्यातून ग्रामीण भागांत लोकांना उत्पन्नाची संधी मिळू शकते. सरकार आपल्या परिने प्रयत्न करत आहेच. पण प्रत्येकाने आपल्या वागण्यातून जनसहभाग दर्शविण्याची गरज आहे. जनसहभाग हा ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’चा मुख्य भाग आहे. निर्सगाचे रक्षण केले, तरच निर्सग आपले रक्षण करेल. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येकाने एक काम असे करावे की, ज्यातून प्रदूषण कमी होईल. उदाहरणार्थ झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे. असे कोणतेही काम देशाच्या 125 कोटी लोकांनी करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय मंत्री यादव पुढे म्हणाले.
युवकांमध्ये पर्यावरण जाणीव हवी
नागरी जाणीवांबरोबर पर्यावरण जाणीव युवकांमधे असणे गरजेचे आहे. आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशात 75 ‘रामसर पाणथळ जागा’ निश्चित केलेल्या आहेत व त्यांची संख्या वाढविण्याकरिता प्रयत्न केला जाईल. हे ‘रामसर पाणथळ’ प्रदेश जपणे आमच्या हाती आहे. विकास हा पर्यावरणाचा समतोल राखून करणे गरजेचे आहे. पाणथळ प्रदेश संवर्धनाला पुढे आणखी गती मिळायला हवी, असे त्यांनी सांगितले.
याकरिता ध्येय निश्चित करून कामे केली पाहिजेत. पाणथळ प्रदेशाचे कमी नुकसान होईल याची काळजी घ्यायला हवी. तसेच हवामान बदल, प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. दर एक सरोवराचे वेगळेपण आहे. त्यानुसार त्याचे जतन करायला हवे. तसेच विद्यापीठे व इतर शैक्षणिक क्षेत्रांतील लोकांना यात सहभागी करून त्यांचा अभ्यास करायला हवा, असे प्रतिपाद़न यादव यांनी केले.
तळय़ांच्या संवर्धनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा ः सावंत
देशातील 75 रामसर प्रतिनिधी या कार्यक्रमास हजर आहेत. राष्ट्रीय पाणथळ मोहीम येथून सुरू झाली असून गोव्याकरिता ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण कुडचडे येथील नंदा तळय़ाचा या 75 रामसर पाणथळ प्रदेशांमध्ये समावेश केला आहे. यासाठी पर्यावरणमंत्र्यांनी प्रयत्न केले. यापुढे ‘रामसर पाणथळ प्रदेशां’त गोव्यातील इतर स्थळांचा समावेश होण्याची शक्यता आहे. गोव्यातील तळय़ांच्या संवर्धनाकरिता सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
‘इको-सेन्सेटिव्ह झोन’मधील गावांबाबत सूट द्यावी
गोव्याचे पर्यावरण, वनक्षेत्र, समुद्रकिनारे यांचे संर्वधन केलेले आहे व केले जाईल. तसेच गोव्यातील 99 गावे ही इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतात. याबाबतीत केंद्रीय वनमंत्र्यांनी थोडी सूट द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री सावंत यांनी केली. तसेच गोवा हा फक्त विदेशी पर्यटकांकरिता प्रसिद्ध नसून येथे सुमारे 480 विविध जातींचे पक्षी येत असतात. त्यापैकी कित्येक पक्षी विदेशी असतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी इतरांची भाषणे झाली.









