तक्रारी वाढणार : फेरलेखापरिक्षण होणार
देवराष्ट्रे/प्रतिनिधी
पाडळी ता.कडेगाव येथील सर्व सेवा सोसायटीत अपहार झाल्याने कडेगाव तालुक्यात खळबळ ऊडाली आहे. अज्ञान पाल्य सभासद असतानाही कर्जवाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यामुळे सोसायटीचा कारभार संशयाच्या भोवर्यात सापडला आहे.
पाडळी येथील सोसायटीच्या अपहाराबाबत सभासद आनंदा पवार यांनी ऊपोषणाचा इशारा दिल्यानंतर सोसायटीतील गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे ऊघडकीस येत आहेत. सोसायटीचे सभासद शंकर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन अज्ञान पाल्य सभासदाच्या नावे कर्ज प्रकरण मंजुर करुन बॅकेतुन परस्पर पैसे काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याबाबत चव्हाण यांनी कडेगाव तालुका निबंधकाकडे तक्रार दिली आहे.
याबाबत कडेगाव तालुका सहाय्यक निबंधक दिपाराणी कोळेकर यांच्याशी संर्पक साधला असता त्या म्हणाल्या सोसायटीच्या सभासदाच्या तक्रारीनंतर फेरलेखापरिक्षण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच सोसायटीचे दप्तर तपासणीसाठी मागवले आहे.तपासणी अधिकारी म्हणुन सहकार अधिकारी व्ही.व्ही. सुर्वे याची नियुक्ती केली असुन तपासणी अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येइल.
सभासदानी तक्रारी द्याव्यात
पाडळी सोसायटीच्या ज्या सभासदाची फसवणुक झाली आहे. अशा सभासदांनी दबावाला बळी न पडता माझ्याकडे तक्रार द्यावी. चौकशी करुन कारवाई करु. – दिपाराणी कोळेकर







