ऑनलाईन वर्गासाठी बसताना पाठीचा कणा ताठ ठेवा, लॅपटॉप समोर घेऊन गादीवर बसू नका, शक्मयतो टेबल-खुर्चीचा उपयोग करा. मधेमधे दोन ते तीन मिनिटांचा ब्रेक घ्या…. या महत्त्वाच्या सूचना ऑर्थोपेडिक म्हणजेच शल्यविशारद डॉक्टरांनी दिल्या आहेत.
मनीषा सुभेदार : बेळगाव
कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले. प्रत्यक्ष वर्ग घेता येत नसल्याने बराच कालावधी लोटल्यानंतर ऑनलाईन वर्ग घेण्याचा पर्याय पुढे आला आणि घराघरांमध्ये लहान मुले आणि कॉलेज विद्यार्थी लॅपटॉपसमोर बसलेले चित्र पाहायला मिळाले. ज्यांच्याकडे लॅपटॉपची सुविधा नाही त्यांनी मोबाईलचा पर्याय स्वीकारला. परंतु या दोन्ही सुविधा मुलांना देण्याइतपत ज्यांची ऐपत नाही त्यांनी काय करायचे? याबद्दल सरकारने कोणतेच भाष्य केले नाही.
कोरोनाने मोठय़ांना लक्ष्य केले. सुदैवाने लहान मुले त्यापासून बचावली. याचे कारण त्यांना दिले गेलेले लसीकरण होय. मात्र, या मुलांसमोर आता वेगळीच समस्या निर्माण झाली आहे आणि काही मुलांबाबत ती निर्माण होण्याची शक्मयता आहे. सतत लॅपटॉपसमोर किंवा मोबाईलसमोर बसणे अपरिहार्य झाले आहे. परंतु बसण्याची पद्धत चुकीची असल्याने मुलांना पाठदुखी, मानदुखी अशा समस्या उद्भवू शकतात.
बेंगळूरमध्ये या समस्यांनी त्रस्त झालेल्या मुलांना घेऊन पालक ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जात आहेत. बेळगावमधील ऑर्थोपेडिक तज्ञांशी चर्चा करता ही समस्या घेऊन अद्याप कोणतेही पालक आले नसले तरी मुलांना ही समस्या भेडसावतच नाही, असे नक्कीच नाही, असे ते म्हणाले. मात्र, बऱयाच ठिकाणी डॉक्टरांपर्यंत जरी मुले पोहोचली नसली तरी त्यांना या समस्या जाणवत नाहीत, असेही नाही.
याच पार्श्वभूमीवर शहरातील नामवंत ऑर्थोपेडिक डॉक्टरांशी चर्चा करता त्यांनी खूप महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे पालन मुलांनी करावयाचे असले तरी त्याची अंमलबजावणी पालकांनीच करायला हवी हेही महत्त्वाचे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू झाल्यानंतर मुलांच्या वडिलांपेक्षा आई त्यामध्ये अधिक गुंतली आहे. मुलाचा अभ्यास ही आईचीच जबाबदारी असल्याची मानसिकताही पुढे आली आहे.
त्यामुळे जितकी दक्षता मुलांनी घ्यायला हवी तितकीच ती पालकांनी व विशेषतः आईने घ्यायला हवी. घरामध्ये शाळेला जाणारी दोन लहान मुले असतील तर दोघांचाही ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करून घेणे म्हणजे आईसाठी सत्त्वपरीक्षाच ठरते आहे. एका अर्थाने पुन्हा एकदा बहुतांश आईंचे शालेय शिक्षण नव्याने सुरू झाले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाबरोबरच मुले मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून गेम खेळणे, प्रामुख्याने चुरशीच्या शर्यती पाहणे यामध्येही गुंतली आहेत. या सर्वांनीच तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचे आणि सूचनांचे पालन करणे हितावह ठरेल.
…ही खरी तर मुलांसाठी शिक्षाच
डॉ. दिनेश काळे, ऑर्थोपेडिक सर्जन
लहान मुलांचे वय पाहता एक ते दोन तास लॅपटॉपसमोर बसणे त्यांना अशक्मय आहे. कोणीही असो, त्याची ऐकण्याची क्षमता ही फार फार तर 45 मिनिटांची असते. नाटक, चित्रपट यामध्ये नाटय़ असल्याने तीन तास बसणे सहज शक्मय असते. परंतु एखादे व्याख्यान आणि त्यातही एखादा विषय 45 मिनिटे ऐकणे ही खरी तर मुलांसाठी शिक्षाच आहे. दुसरे म्हणजे हा सर्व एकतर्फी कारभार आहे. कारण वर्गामध्ये मुले प्रश्न विचारू शकतात. इथे तसे शक्मय नाही. मुलांच्याबरोबर आईला बसावे लागते. त्यामुळे तिलाही त्रास होतो आहे. दोन मुले असतील तर हा त्रास अधिक वाढणार आहे. खरे तर संपूर्ण एक वर्ष दरी पडली तरी फारसे काहीही बिघडणार नाही. एक वर्ष मुले मनसोक्त खेळू शकतील आणि पुढील वषी जोमाने अभ्यासाला लागतील. सतत स्क्रीनवर बसल्याने अंगदुखी, पाठदुखी उद्भवू शकते, हे पालकांनी लक्षात घ्यावे.
गादीवर बसून
अभ्यास करणे चुकीचे
डॉ. एन. एम. पाटील,
ऑर्थोपेडिक सर्जन
मुळात मुलांनी गादीवर बसून अभ्यास करणे बंद करायला हवे. शाळेत ज्या प्रमाणे बाकावर बसतात तसेच बसणे आवश्यक आहे. घरी बाक नसल्याने खुर्चीचा वापर करावा. लॅपटॉप डोळय़ांच्या समोर स्पष्ट असावा, पुढे वाकून अभ्यास करण्याचे टाळायला हवे. ही बाब मुलांप्रमाणेच मोठय़ांनाही लागू आहे. कारण वाकून अभ्यास करणे, मोबाईल पाहणे यामुळे पाठ आणि मान यांचे दुखणे उद्भवू शकते.









