वार्ताहर/ पाटण
येथील आतार गल्लीतील एका घराला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटने अचानक आग लागली. यात संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून आगीत घरातील धान्य, कपडालत्ता, रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, कपाटसह संसारोपयोगी सर्व साहित्य, दुकानातील साहित्य व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचा पंचनामा करण्यात आला असून आगीत सुमारे अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण शहरात आतारगल्लीत अजमुद्दीन कासम आतार, शहाबुद्दीन कासम आतार व महिबूब कासम आतार या तिघा भावांचे घर आहे. अजमुद्दीन व शहाबुद्दीन हे नवीन घरात वास्तव्यास आहेत. तर महिबूब हे जुन्या घरात राहत आहेत. मंगळवार 22 रोजी महिबूब हे आपल्या कुटुंबीयांसोबत परगावी गेले होते. त्याचदिवशी मध्यरात्री 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला शॉर्टसर्कीटने अचानक आग लागली. शेजारील लोकांना आग लागल्याचे समजताच आगीची कल्पना अग्निग्नशमन विभागाला दिली. तत्पूर्वी येथील सिराज आतार, जमीर आतार, सिकंदर आतार, नकीम आतार, करिम आतार, मोसीन आतार, शकील आतार आदींसह युवकांनी घराचा दरवाजा तोडला व मिळेल तेथून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱयांनी घरातील विद्युत पुरवठा खंडित केला.
पहाटेच्या 5 वाजण्याच्या सुमारास अग्निग्नशमन बंब दाखल झाल्यानंतर दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. या आगीत घरातील धान्य, कपडालत्ता, रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, घरघंटी, कपाटसह संसारोपयोगी सर्व साहित्य, दुकानातील साहित्य तसेच महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत.
आगीची माहिती मिळताच पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, तलाठी जयेश शिरोडे, स्वप्नील नेवरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला आहे. या आगीत महिबूब आतार यांचे सुमारे अकरा लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. जळीतग्रस्त कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.








