सेन्सेक्स 1627.73 अंकांनी वधारला : निफ्टी 8,749.70 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ामध्ये मुंबई शेअर बाजारांमध्ये एकूण पाच सत्रांपैकी शेवटच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्समध्ये तेजीची उसळी घेतली आहे. मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गुंतवणूकदार चिंतेत राहिले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या समभागांची विक्री केली आहे. तर दुसऱया बाजूला जगातील 150 हून अधिक देश कोरोनाच्या प्रभावाखाली आले आहेत. यामुळे जगभरातील आयात निर्यात ठप्प झाली आहे. विविध देशांच्या आर्थिक घडी विस्कटत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचेही मत अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहेत.
शुक्रवारी आठवडय़ातील शेवटच्या दिवशी दिवसअखेर सेन्सेक्स 1627.73 अंकानी वधारुन निर्देशांक 29,915.96 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी दिवसअखेर 482.00 अंकांनी वधारुन निर्देशांक 8,749.70 वर बंद झाला आहे.
दिवसभरातील व्यवहारात प्रमुख कंपन्यापैकी ओएनजीसीचे समभाग सर्वाधिक 18 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी, आयटीसी आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग लाल निशाण्यावर बंद झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील जनतेला कोरोना विषाणुशी लढण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिकाचे असून त्याला थोपवण्यासाठी सर्वानी संयम दाखविण्याची गरज असल्याचे म्हटले होते. व येत्या रविवारी स्वतःहून बंद पाळण्यासाठी आवाहन केले होते. याचा काहीसा सकारात्मक प्रभाव भारतीय शेअर बाजारांवर झाल्याचे दिसून आले आहे.
बाजारातील तेजीची कारणे
मागील चार दिवसांमधील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी खालील स्तरावरुन खरेदी केली.जगातील प्रमुख देशात कोरोनाचा संसर्ग प्रभावित झाला असून यासाठी उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यासाठीची उपयायोजना करण्यावर विचार केला जात आहे.
अमेरिकेसह प्रमुख आशियाई बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणांमुळे भारतीय बाजार सावरला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत दोन दिवस तेजी राहिली आहे. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना जादा नुकसानीचे अनुमान नसल्याचेही म्हटले जात आहे.









