ब्लॅकमेलिंगचा प्रकार झाला होता असहय़
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदू मुलीने सामूहिक बलात्कारानंतर होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला त्रासून आत्महत्या केली आहे. या मुलीचे मागील वर्षी जुलै महिन्यात तीन जणांनी अपहरण केले होते. या तिघांनी तिच्यावर बलात्कार करत त्याचे चित्रणही केले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद होत आरोपींना अटक देखील झाली होती. परंतु काही दिवसांतच त्यांना जामीन मिळाला होता. सर्व आरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी पीडितेला ब्लॅकमेल करण्यास प्रारंभ केला होता, यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी वैद्यकीय अहवालातून मिळाली होती अशी कबुली अतिरिक्त पोलीस अधीक्षक अब्दुल्ला अहमदयार यांनी दिली आहे. स्थानिक हिंदू समुदायाच्या नेत्यांनी आरोपींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. आरोपींना त्वरित अटक न झाल्यास निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









