बौद्ध काळातील सर्वात प्राचीन मंदिर
पाकिस्तानात पाकिस्तानी आणि इटालियन पुरातत्व तज्ञांच्या एका संयुक्त पथकाने बौद्ध काळातील 2,300 वर्षे जुन्या एका मंदिराचा शोध लावला आहे. याचबरोबर काही अमूल्य कलाकृतीही उत्खननात हस्तगत झाल्या आहेत. हे मंदिर खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या स्वात जिल्हय़ात बारीकोट तालुक्याच्या बौद्धकाळातील बाजीरा शहरात मिळाले आहे. या मंदिराला पाकिस्तानात बौद्धकाळातील सर्वात प्राचनी मंदिर म्हटले जात आहे. स्वातमधील हे मंदिर तक्षशिला येथील मंदिरांपेक्षाही जुने असल्याचा दावा एका अधिकाऱयाने केला आहे.
मंदिरासह पुरातत्व तज्ञांना बौद्धकालीन 2,700 हून अधिक कलाकृती सापडल्या असून यात नाणी, अंगठय़ा, भांडी आणि ग्रीक राजा मिनांदरच्या काळातील खरोष्ठी भाषेतील सामग्री सामील आहे. बाजीरा शहरात उत्खननादरम्यान आणखीन पुरातत्विक स्थळं सापडण्याची शक्यता असल्याचे इटालियन तज्ञांकडून म्हटले गेले. पाकिस्तानातील पुरातात्विक स्थळं जगाच्या विविध धर्मांसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे उद्गार इटलीचे राजदूत आंद्रे फेरारिस यांनी काढले आहेत.