अविश्वास प्रस्ताव सादर ः सैन्य पाठिशी असल्याचा इम्रान यांचा दावा
@ वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी पंतप्रधान इम्रान खान विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावात अनियंत्रित महागाईसाठी सरकारला जबाबदार ठरवत इम्रान यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सुमारे 100 खासदारांची स्वाक्षरी असलेला प्रस्ताव नॅशनल असेंबली सचिवालयाला सोपविण्यात आला आहे.
नियमांनुसार सभापतींच्या मार्फत अधिवेशन बोलाविण्यासाठी संसदेच्या किमान 68 खासदारांच्या स्वाक्षरीची गरज असते. अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी 3-4 दिवसांचे अधिवेशन बोलाविण्याची तरतूद आहे. विरोधी पक्षाला पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला हटविण्यासाठी 342 सदस्यीय सभागृहात 172 सदस्यांच्या समर्थनाची गरज आहे. इम्रान खान हे आघाडी सरकारचे नेतृत्व करत आहेत. काही घटक पक्षांनी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास इम्रान यांना पद गमवावे लागू शकते.
देशाचे सैन्य माझ्यासोबत उभे असून सरकार टिकणार असा मला विश्वास आहे. सैन्य कधीच ‘चोरां’ना समर्थन देणार नाही. विरोधी पक्षांना लोकांचे समर्थन मिळत नसल्याने ते सैन्याचा पाठिंबा असल्याचे म्हणत आहेत. माझ्या सरकारच्या विरोधात 2028 पर्यंत काहीच घडणार नाही. विरोधकांना अपमानास्पद पराभवाला तोंड द्यावे लागणार असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.
विरोधकांचे आरोप
पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या हजारो समर्थकांनी मंगळवारी इम्रान खान यांनी पद सोडावे किंवा संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे अशी मागणी करत सभा घेतली. अर्थव्यवस्था आणि शासनाचे चुकीचे व्यवस्थापन इम्रान खान यांनी केल्याचा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून करण्यात आला आहे.









