ऑनलाईन टीम / पेशावर :
पाकिस्तानातील झियारत डोंगररांगांमधील संगमरवराची खाण कोसळून मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या 26 वर पोहचली आहे. अजूनही 7 जण बेपत्ता असून, त्यांच्या शोध घेण्यात येत आहे.
पेशावरपासून 85 किलोमीटरवर असलेल्या झियारत डोंगररांगांमधील संगमरवराची खाण प्रसिद्ध आहे. सोमवारी रात्री (दि. 7) तेथील डोंगराचा मोठा भाग खचला आणि तो भूभाग खाणीत कोसळला. या दुर्घटनेत 12 खाणकामगार जागीच ठार झाले होते. तर 7 जणांचा जिल्हा मोहम्मद रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काही मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते.
दुर्घटना घडली त्यावेळी खाणीत 45 कामगार काम करत होते. आतापर्यंत त्यामधील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जण बेपत्ता आहेत. 9 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. तर 3 जण जखमी आहेत. दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये खैबर पख्तुनवा साफी गावातील टेकडीवरच्या काही पर्यटकांचाही समावेश आहे. दरम्यान, दुर्घटनेतील मृतांच्या कुटूंबियांना प्रत्येकी 9 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.









