ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पॅरामिलिटरी फोर्सच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पाक लष्कराचे 6 सुरक्षा कर्मचारी ठार झाले. यावेळी तीन दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात पाक सैन्याला यश आले आहे. या हल्ल्यात 22 जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार, दक्षिण वझिरीस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टँक जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एफसी लाईनवर हल्ला केला. गोळीबारादरम्यान तीन हल्लेखोरांनाही कंठस्नान घालण्यात आले. हल्लेखोर बॉम्ब लावून कॅम्पमध्ये घुसले होते. या हल्ल्यात 6 सुरक्षारक्षक ठार झाले असून, 22 जण जखमी आहेत. यामध्ये लष्कराचे किती लोक जखमी किंवा मारले गेले आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. या हल्ल्यासाठी टीटीपीला जबाबदार धरले जात आहे.
दरम्यान, ठार झालेल्या दहशतवाद्यांकडे अमेरिकी शस्त्रास्त्रे होती. 3 दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच या भागात जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.









