सैन्याचा हस्तक्षेप विरोधी पक्षांना नामंजूर : इम्रान यांनी बाजवा यांनाच सत्तेत आणावे
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सैन्याला आव्हान देण्याचे धाडस आतापर्यंत सत्ताधाऱयांनीही दाखविले नव्हते. परंतु बदलत्या काळात सैन्यच सर्वाधिक निशाण्यावर आहे. सैन्याला राजकीय पक्ष आता थेट आव्हान देऊ लागले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी दीर्घकाळापासून सैन्यावर सडकून टीका करत होते. परंतु आता माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची त्यांना साथ साथ मिळाली आहे. मौलाना फजल-उर-रहमान देखील सैन्याला लक्ष्य करण्यास मागे नाहीत.
2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाल्यापासूनच ते सैन्यामुळेच या पदावर पोहोचल्याचे आरोप होत आहेत. बिलावल हे दोन वर्षांपासून स्वतःच्या भाषणांमध्ये ही बाब मांडत आहेत. नवाज यांचा पीएमएल-एन हा पक्षही याचे अनुकरण करत आहे. विरोधक एकजूट होऊन इम्रान सरकार पाडविण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. तर सरकार एका मागोमाग एक विरोधी नेत्यांना तुरुंगात डांबत आहे.
सैन्याने निवडणुकीत गडबड केल्यानेच लोकांचा त्याच्यावरील विश्वास डळमळीत झाला आहे. सैन्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे त्रास होतोय. सैन्याला राजकारणापासून दूर व्हावे लागेल असे नवाज यांनी म्हटले आहे.
सैन्याशी संघर्षाची तयारी
सैन्याने सरकारचे समर्थन बंद न केल्यास विधानसभा आणि संसदेत निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी राजीनामा देतील. मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सैनिकांना का तैनात करण्यात आले हे समजत नाही. गिलगिट-बाल्टिस्तानला 5 वा प्रांत करण्यास आक्षेप नाही, परंतु हे काम संसदेऐवजी सैन्य का करत आहे असे विधान बिलावल यांनी केले आहे.
11 पक्ष आणि एक बॅनर
20 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या 11 विरोधी पक्षांनी एक आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून ते सरकार पाडविण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाकिस्तान डेमोक्रेटिक मूव्हमेंट नाव देण्यात आले आहे. बैठकांचे सत्र सुरू झाले असून निदर्शनही होत आहेत. जानेवारी महिन्यात इस्लामाबादपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. बिलावल आणि नवाज हे इम्रान यांना ‘सिलेक्टेड पीएम’ संबोधू लागले आहेत.









