मँचेस्टर
पाकिस्तानने इंग्लंड दौऱयाची सांगता विजयाने करताना येथे झालेल्या तिसऱया व शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडविली. 52 चेंडूत नाबाद 86 धावांची खेळी करणाऱया अनुभवी मोहम्मद हाफीझला सामनावीराचा बहुमान मिळाला.
या सामन्यातही प्रथम फलंदाजी मिळाल्यावर हाफीझ व युवा खेळाडू हैदर अली यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱया गडय़ासाठी शतकी भागीदारी केल्यामुळे पाकने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 190 धावा जमविल्या.
हाफीझचा हा 94 वा सामना असून त्याने वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्येशी बरोबरी साधली. 19 वर्षीय हैदर अलीने पदार्पणातच 33 चेंडूत 54 धावांची खेळी करताना 5 चौकार, 2 षटकार मारले. याशिवाय कर्णधार बाबर आझमने 21, शदाब खानने 15 धावा जमविल्या. इंग्लंडने 195 धावांचे उद्दिष्ट जवळपास गाठले होते. शेवटच्या दोन चेंडूत त्यांना 12 धावांची गरज असताना टॉम करनने एक षटकार मारला. पण पुढच्या चेंडूवर त्याला फटका मारता न आल्याने 20 षटकांत त्यांना 8 बाद 185 धावांपर्यंतच मजल मारता आली. मोईन अलीने सर्वाधिक 61 धावा जमविताना 33 चेंडूत 4 चौकार, 4 षटकार मारले. याशिवाय बँटनने 46, सॅम बिलिंग्सने 26, ग्रेगरीने 12 धावा केल्या. पाकच्या वहाब रियाझ व शाहीन आफ्रिदी यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले तर इमाद वासिम व हॅरिस रौफ यांनी एकेक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकांत 4 बाद 190 : हाफीझ 52 चेंडूत 4 चौकार, 6 षटकारांसह नाबाद 86, हैदर अली 33 चेंडूत 54, बाबर आझम 21, जॉर्डन 2-29. इंग्लंड 20 षटकांत 8 बाद 185 : मोईन अली 33 चेंडूत 61, बँटन 31 चेंडूत 8 चौकारांसह 46, बिलिंग्स 24 चेंडूत 26, रियाझ 2-26, आफ्रिदी 2-28, वासिम 1-35, रौफ 1-41.









