वृत्तसंस्था / रावळपिंडी
शनिवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेचा 6 गडय़ांनी पराभव करून मालिकेत आघाडी घेतली. 55 चेंडूत 82 धावांची खेळी करणारा कर्णधार बाबर आझमला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ले मधेवेरेच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर झिंबाब्वेने 20 षटकांत 6 बाद 156 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 18.5 षटकांत 4 बाद 157 धावा जमवित विजय साकार केला. बाबरने आपल्या खेळीत 9 चौकार, 1 षटकार मारला तर मोहम्मद हाफीझने 32 चेंडूत 36, फक्र झमानने 12 चेंडूत 19 धावा केल्या.
तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या लढतीत झिंबाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिंबाब्वे संघातील 20 वर्षीय फलंदाज वेस्ले मधेवेरेने 48 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 70 धावा जमविल्या. मधेवेरेने चिगुंबुरासमवेत सहाव्या गडय़ासाठी 34 धावांची भागिदारी केली. चिगुंबुराने 13 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकारांसह 21 धावा जमविल्या. पाकतर्फे 27 वर्षीय उस्मान कादीरचे टी-20 प्रकारात पदार्पण झाले आहे. उस्मान कादीर हा पाकचा माजी फिरकी गोलंदाज अब्दुल कादीरचा मुलगा आहे. गेल्यावर्षी अब्दुल कादीरचे निधन झाले होते. शनिवारच्या सामन्यात पाकतर्फे हॅरीस रौफ आणि वहाब रियाज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.









