पडताळणीनंतर वास्तव उलगडणार
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात घुसण्यात यशस्वी झालेल्या सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेकडून जप्त केलेली सर्व कागदपत्रे नोएडा पोलिसांनी तिच्या ओळखीच्या पडताळणीसाठी दिल्लीतील पाकिस्तान दुतावासाकडे पाठवली आहेत. सीमा हैदरने प्रियकर सचिन मीणासोबत मे महिन्यात बेकायदेशीरपणे नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्यामुळे तिच्यावर संशय आहे. पोलिसांनी त्यांना 4 जुलै रोजी पकडल्यापासून ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.
नोएडा पोलिसांसह अन्य तपास यंत्रणांकडून सध्या सीमा हैदरची चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान पोलिसांनी सीमा हैदरची अनेक कागदपत्रे जप्त केली असून तिचा पासपोर्ट, पाकिस्तानी ओळखपत्र आणि तिच्या मुलांच्या पासपोर्टचा समावेश आहे. ती पाकिस्तानी नागरिक आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी ही सर्व कागदपत्रे आता पाकिस्तान दुतावासाकडे पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, पोलीस सीमा हैदरच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. पोलिसांनी तिचा जप्त केलेला मोबाईल अधिक तपासासाठी गाझियाबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. फॉरेन्सिक अहवाल आणि सीमा हैदरच्या पाकिस्तानी नागरिकत्वाची पुष्टी हे दोन्ही प्रलंबित असून ते प्राप्त होईपर्यंत तपास सुरूच राहणार आहे. दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणासंदर्भात आरोपपत्र तयार केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.









