दिवाळीच्या पहाटेपासूनच जिल्हय़ात थंडीची चाहूल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
यावर्षी पावसाचा मुक्काम चांगलाच लांबला होता, अगदी ऑक्टोबरमध्येही तो ठाण मांडून राहिला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जरी या पावसाने काढता पाय घेतला असला तरी तो पुन्हा कधी एन्ट्री घेईल याचा नेम नाही. पण आता तर दिवाळीला प्रारंभ झाला असून या दिवाळीत सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱया थंडीने दीपावलीच्या पहिल्याच दिवशी येथील ग्रामीण भागातील नागरिकांना अभ्यंगस्नानाचे उटणे लावतानाच गारठवल्याचा प्रत्यय आला.
राज्यातून आता मान्सून काढता पाय घेणार आणि सर्वांना आरोग्यासाठी सर्वात फलदायी असलेल्या हिवाळ्य़ाची चाहूल लागणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस परतीच्या प्रवासाला लागणार कधी याकडे साऱयांना प्रतीक्षा लागलेली होती. दिवाळी आली तरी मान्सूनचा प्रवास दमदार सुरूच राहिला. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर साऱयांच्या उत्साहाचा हिरमोड होत होता.
यंदाचा पावसाळा जवळपास 100 दिवस चालल्यानंतर 20 ऑक्टोबरपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला. त्यामुळे सोमवारी दिवाळीच्या पहाटेपासूनच थंडीची लहर जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात लोकांना अनुभवायला मिळाली. थंडीसोबतच दाट धुक्याची झालर असे वातावरण आता दिसू लागले आहे. तर पावसामुळे खोळंबलेल्या शेतीच्या कामांनीही आता वेग घेतला आहे. शेतकरी ऐन दिवाळीत शेतात कापणीच्या कामात व्यस्त दिसत आहेत.









