निपाणी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
वार्ताहर / तवंदी
पांगिरे-बी येथील सेंट्रिंग काम करणाऱया कामगाराचा निपाणी येथे संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यशवंत उर्फ पिंटू विष्णू कांबळे (वय 35) असे त्या तरुणाचे नाव आहे.
यशवंत हे सोमवारी पहाटे घरातून निघून गेले होते. घरातून निघून गेलेले यशवंत घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवार, नातेवाईक यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. बराच शोध घेऊनही यशवंत यांचा पत्ता न लागल्याने सर्वांचीच चिंता वाढली.
मंगळवारी दुपारी निपाणीतील बौद्धनगरनजीक आमराईतील झाडाला एका युवकाचा मृतदेह लटकत असल्याची माहिती मिळाली. यानंतर नातेवाईकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यशवंत यांचा मृतदेह लटकत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी सीपीआय संतोष सत्यनायक, शहर फौजदार अनिलकुमार कुंभार आदीनी भेट देऊन पंचनामा केला. महात्मा गांधी रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची फिर्याद पत्नी सुनीता कांबळे यांनी दिली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.









