सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या पहिला उद्रेक थंडावल्यानंतर आपण काहीसे बेसावध राहिल्याने दुसऱया अधिक तीव्र उद्रेकाचे संकट उद्भवले आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत आपण कोणीही धीर सोडता कामा नये. संकटे येतात आणि जातात. आपण मात्र आलेल्या समस्येला कणखपणे तोंड देण्याची आवश्यकता आहे. संयम आणि नियमपालन यांच्या आधारावर तसेच आपल्यातील भेदभाव विसरून, एकोप्याने आपण या संकटावर मात करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जे धैर्यवान असतात ते नेहमी प्रयत्न सुरू ठेवतात. आपल्यालाही हाच मार्ग अवलंबावा लागेल. या संकटावर मात करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार आपल्याला घ्यावा लागेल. प्रत्येक उपाय हा वैज्ञानिक तत्वांवरच आधारित असावयास हवा. सामुहिक प्रयत्न आवश्यक आहेत. कोणत्याही अनधिकृत उपायांचे आणि मार्गांचे आपण समर्थन करता कामा नये. तसेच अशा अवैज्ञानिक मार्गांचा अवलंबही करता काम नये. आयुर्वेदाच्या नावाने अनेकजण वेगवेगळे उपाय सुचवित आहेत. पण आपण यापैंकी जे अधिकृत मान्यता मिळालेले उपाय असतील त्यांचेच आचरण केले पाहिजे ही महत्वाची भूमिका त्यांनी मांडली.
आपल्यातले दोष दिसतील
कोणत्याही संकटकाळात आपण आपल्यातील दोष दूर करणे आवश्यक असते. कोरोनाच्या भीषण उदेकामुळे आपल्याला स्वतःमधील दोष दिसतील. याचा उपयोग आपल्याला आपल्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी होईल. अनुभवातून आपण शिकत असतो. अनेक लोक केवळ घाबरून रूग्णालयांमध्ये जातात .तेथे प्रवेश घेतात. जागा आडवून ठेवतात. त्यामुळे ज्यांना खरोखरच रूग्णालयात उपचार घेण्याची आवश्यकता असते त्यांना संधी मिळत नाही. तेव्हा वैद्यकीय सल्ल्यानुसारच आपण रूग्णालयात प्रवेश घेण्याचा निर्णय घ्यावा. केवळ अनाठायी भीतीपोटी असे करणे हे योग्य आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.









