भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी सोमवारी कुस्ती पंढरी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. मातीशी इमान राखणारा आणि कुस्तीशी प्रामाणिक असणारा एक ताराच अस्ताला गेला असे नव्हे तर उत्तर भारत आणि थेट पाकिस्तानात मराठी मातीचा डंका पिटणारे इतिहासाचे पान पालटले आहे. आधुनिक कुस्तीचे आणि दैनंदिन सरावाचे कोणतेही तंत्र विकसित झाले नव्हते त्या काळात एकसंबाजवळच्या खंचनाळ गावच्या एका पैलवानाने आपल्या श्रीपती नावाच्या मुलाला मोठा मल्ल बनवण्याचे स्वप्न बघितले. बेळगाव जिल्हय़ातल्या चिकोडी तालुक्मयात आणि महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱया खंचनाळ गावातून केवळ लंगोट घेऊन हा मल्ल कुस्ती पंढरी कोल्हापुरात शाहूपुरी तालमीत आला. पुढे त्याने मराठी मातीचा झेंडा संपूर्ण हिंदुस्थानात फडकवला. 3 मे 1959 ही तारीख महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिली आहे. या दिवशी राजधानी दिल्लीच्या न्यू रेल्वे स्टेडियमवर भारताची पहिली हिंदकेसरी स्पर्धा सुरू होती. साखळी फेरीतील सर्व कुस्त्या चितपट करत खंचनाळे अंतिम फेरीत पोहोचले. रुस्तुम-ए-पंजाब बत्तासिंग याच्याबरोबरची त्यांची अंतिम कुस्ती पंचानी बरोबरीत सोडवली. पण श्रीपती खंचनाळे यांनी हा निकाल मानला नाही. थेट राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना भेटून त्यांनी कुस्ती निकाली होईपर्यंत आपली लढायची तयारी असल्याचे सांगितले. दुसऱया दिवशी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या उपस्थितीत पुन्हा कुस्ती लावण्यात आली आणि ती कुस्ती खंचनाळे यांनी जिंकली. राष्ट्रपतींच्या हस्ते बहुमान आणि पंतप्रधानांच्या हस्ते मानाचे पदक मिळवून श्रीपती खंचनाळे भारताचे पहिले हिंदकेसरी झाले. ही घटना केवळ पहिली-वहिली म्हणूनच कुस्तीच्या इतिहासात महत्त्वाची नाही, तर या कुस्तीने महाराष्ट्राच्या मल्लांना एक ध्येय दिले. कुस्ती क्षेत्रावर त्या काळापर्यंत वर्चस्व असणाऱया उत्तर भारतातील आणि पाकिस्तानच्या मल्लांना आपण चितपट करू शकतो याची जाणीव मराठी मातीला या कुस्तीने करून दिली. पुढे हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, दीनानाथ सिंह, हजरत पटेल, हिंदकेसरी नसलेले पण दबदबा असलेले विष्णुपंत सावर्डेकर अशा दिग्गज मल्लांनी पंजाबी मल्लांना अस्मान दाखवत मैदानी कुस्तीत मराठी मल्ल मोठे धाडस करू शकतात हे दाखवून दिले. ज्या काळात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली नव्हती तेव्हा सांगली येथे अमराईमध्ये झालेल्या कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात त्याच तोलामोलाची कुस्ती जिंकून खंचनाळे नावाचा दबदबा वाढवला. सादिक पंजाबी या महान मल्लाला चितपट करणे असो किंवा गणपतराव आंदळकर यांच्याबरोबर झालेली बरोबरीची कुस्ती असो, त्यांच्या कुस्त्या आणि त्यांची मेहनत या नेहमीच दंतकथा बनून राहिल्या. हिंदकेसरी मारुती माने यांच्या व्यायामाबद्दल कुस्ती क्षेत्रात भरपूर बोलले जाते, मात्र खुद्द मारुती माने हे श्रीपती खंचनाळे यांच्या व्यायाम आणि शिस्तीबद्दल आयुष्यभर भरभरून बोलायचे. महिन्याला 25 किलो तूप आणि ओंजळीने बदाम, रोज 3000 जोर आणि तितक्मयाच बैठका मारणारा, संपूर्ण आखाडा उकरून काढणारा असा खंचनाळेंचा व्यायाम हा ज्या काळात कुस्तीला सुयोग्य प्रशिक्षक उपलब्ध नव्हते त्या काळात मान्यता पावला. मल्ल म्हणून वैयक्तिक कामगिरी संपल्यानंतरही खंचनाळे शांत राहिले नाहीत. वस्ताद म्हणून त्यांनी पन्नास वर्षे शाहूपुरी तालमीसाठी दिले. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, हिंदकेसरी हजरत पटेल, मोहम्मद हनीफ यांच्यासह अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे मल्ल खंचनाळे यांनी घडवले. कुस्तीगिराला शासन दरबारात मान आणि पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ते आयुष्यभर झटले. मात्र या महान मल्लाच्या वाटय़ाला कधी अर्जुन, खेल रत्न असे पुरस्कार आलेच नाहीत. महाराष्ट्राने यशाचे स्वप्न पाहण्यापूर्वी कारकीर्द गाजवलेल्या या महान मल्लाकडे महाराष्ट्राने अक्षरशः दुर्लक्ष केले. ‘शिवछत्रपती पुरस्कार’ हा एकमेव पुरस्कार तर सीमाभागात असल्याने कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. लिंगायत समाजात जन्माला आलेल्या या मल्लाने आयुष्यभर शाकाहारी व्रत जोपासले. पहिले हिंदकेसरी शाकाहारी होते असे आज जर कोणाला सांगितले तर त्यांना ते पटणार नाही. कोल्हापूर तालीम संघाचे अध्यक्ष, देशातील पारंपरिक संघटनांच्या विरोधात आवाज उठवून स्थापन केलेल्या राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाचे 5 वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. कोणत्याही बाबतीत बोटचेपी भूमिका न घेता सत्याला सामोरे जाणारे आणि स्पष्टवक्ते म्हणून त्यांना कुस्ती क्षेत्रात मान होता, म्हणूनच पुढे कुस्तीगीर महासंघाचे कायम आश्रयदाते म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. आज महाराष्ट्राची कुस्ती तांत्रिकदृष्टय़ा बरीच पुढे गेलेली आहे. आमच्या मल्लांना ऑलिम्पिक पदक खुणावू लागले आहे. लवकरच हे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरेल आणि खाशाबांचे वारसदार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीतून निपजतील असे वातावरण घडत आहे. त्याचवेळी कुस्ती क्षेत्राला आपापसातील वाद आणि वर्चस्ववादानेही पछाडले आहे. दुर्दैवाने त्याला खंचनाळे यांची तालीमसुद्धा अपवाद नाही. कुस्तीच्या भल्यासाठी या नव्या-जुन्या मंडळींनी या सर्व वादांना मागे सारून महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेते निर्माण करणे हीच पहिल्या हिंदकेसरीना मानवंदना ठरू शकेल. अन्यथा केवळ इतिहासाची पाने आणि कधीकाळचा इतिहास सांगतच महाराष्ट्राला बसावे लागेल. या क्षेत्रातील मंडळींनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
Previous Articleतामिळनाडूत कमल हासन-ओवैसी यांच्यात युती?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








