विंडीजला 200 धावांचे आव्हान, चहापानाअखेर 4 बाद 143 धावापर्यंत मजल
वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन
इंग्लंड व विंडीज यांच्यातील पहिली कसोटी अतिशय रंगतदार स्थितीत पोहोचली असून पाचव्या व शेवटच्या दिवशी चहापानास खेळ थांबला तेव्हा विंडीजने 200 धावांच्या विजयाचा आव्हानाचा पाठलाग करताना 45 षटकांत 4 बाद 143 धावा जमविल्या होत्या.
या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत गुंडाळल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 318 धावा जमवित इंग्लंडवर 114 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने दुसऱया डावात सुधारित प्रदर्शन करीत सर्व बाद 313 धावा जमवून एकूण 199 धावांची आघाडी घेत विंडीजला 200 धावांचे विजयाचे उद्दिष्ट दिले. इंग्लंडने पाचव्या व शेवटच्या दिवसाच्या खेळाला 8 बाद 284 धावांवरून पुढे सुरुवात केली आणि आर्चर, मार्क वूड व अँडसरन यांनी त्यात आणखी 29 धावांची भर घातली. आर्चरने 23 धावांचे योगदान दिले. विंडीजच्या गॅब्रिएलने या डावात 5 बळी टिपले. त्याची ही पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची सहावी वेळ होती. रॉस्टन चेस व अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. होल्डरने प्रतिस्पर्धी कर्णधार स्टोक्सचा बळी मिळविला.
विंडीजच्या दुसऱया डावाची सुरुवात मात्र खराब झाली. आर्चर व वूड यांनी भेदक मारा केल्याने उपाहाराला त्यांची स्थिती 3 बाद 35 अशी नाजुक झाली होती. सलामीवीर ब्रेथवेटला आर्चरने सहाव्या षटकात त्रिफळाचीत केले तर वुडने शाय होपचा 9 धावांवर त्रिफळा उडविला. दुसरा सलामीवीर कॅम्पबेलच्या बोटाला दुखापत झाल्याने तो निवृत्त झाला. त्याआधी आर्चरने ब्रूक्सला शून्यावर पायचीत केले होते. रॉस्टन चेस व जर्मेन ब्लॅकवूड यांनी उपाहारानंतरच्या सत्रात डाव सावरताना चौथ्या गडय़ासाठी 73 धावांची भागीदारी केली. धावसंख्या 100 झाली असताना आर्चरनेच ही जोडी फोडली. त्याने चेसला 37 धावांवर बटलरकरवी झेलबाद केले. 88 चेंडूंच्या खेळीत त्याने केवळ 1 चौकार मारला. ब्लॅकवूडने नंतर डॉरिचच्या साथीने सावध व अधूनमधून हल्ला करीत 44 षटकाअखेर संघाला 139 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. ब्लॅकवूडने या सत्रात आपले अर्धशतकही पूर्ण केले. आणखी दोन षटकानंतर चहापानास खेळ थांबला तेव्हा ब्लॅकवूड 65 तर डॉरिच 15 धावांवर खेळत होते. यावेळी त्यांना विजयासाठी अद्याप 57 धावांची जरूरी होती.
त्याआधी इंग्लंडच्या दुसऱया डावात सिबली (50), क्रॉली (76) यांनी अर्धशतके नोंदवली तर बर्न्स (42), कर्णधार स्टोक्स (46), डेन्ली (29) यांनी उपयुक्त योगदान दिले. आर्चरने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्याने इंग्लंडला तीनशेचा टप्पा पार करता आला.
विंडीजने आजवर पहिल्या डावात शंभर किंवा त्याहून जास्त आघाडी घेतल्यानंतर एकही कसोटी गमविलेली नाही. याशिवाय दोन्ही कर्णधारांनी एकमेकांना सामन्यात तीन वेळा बाद करण्याची कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
संक्षिप्त धावफलक : (चहापानापर्यंत) : इंग्लंड प.डाव 204, विंडीज प.डाव 318, इंग्लंड दु.डाव 111.2 षटकात सर्व बाद 313 (बर्न्स 42, सिबली 50, क्रॉली 76, डेन्ली 29, स्टोक्स 46, आर्चर 23, अवांतर 17, गॅब्रिएल 5-75, चेस 2-71, जोसेफ 2-45, होल्डर 1-49). विंडीज दु.डाव 45 षटकात 4 बाद 143 (ब्रेथवेट 4, होप 9, चेस 37, ब्लॅकवूड खेळत आहे 65, डॉरिच खेळत आहे 15, आर्चर 3-35).









