राज्यातील पहिलाच प्रयोग : दिव्यांग तसेच वयोवृद्ध विमान प्रवाशांची होणार सोय
प्रतिनिधी /बेळगाव
दिव्यांग अथवा वयोवृद्ध विमान प्रवाशांना विमानामध्ये चढताना अनेक समस्या येत होत्या. इतर व्यक्तींचा आधार घेत अशा नागरिकांना विमानात चढावे-उतरावे लागत होते. परंतु यापुढे बेळगाव विमानतळावर अशा प्रवाशांसाठी ऍम्बुलिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यात ऍम्बुलिफ्ट असणारे बेळगाव हे पहिलेच विमानतळ ठरले आहे.
सध्या विमान प्रवाशांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे त्याच प्रमाणात प्रवाशांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे हे विमानतळ प्रशासनाचे काम असते. विमानाची उंची अधिक असल्यामुळे पायऱया चढून विमानात जावे लागते. बऱयाच वेळा दिव्यांग, वयोवृद्ध व्यक्तींना कर्मचाऱयांच्या साहाय्याने विमानात चढावे लागते. यामध्ये त्या व्यक्तीला बराच त्रास होतो. हे टाळण्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने बेळगाव विमानतळाला ऍम्बुलिफ्ट दिली आहे.
प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर
मंगळवारी ही ऍम्बुलिफ्ट बेळगाव विमानतळावर दाखल झाली. विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांच्या हस्ते ऍम्बुलिफ्टचे उद्घाटन करण्यात आले. या ऍम्बुलिफ्टसाठी 100 रुपये आकारणी केली जाणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.









