रोहित पोरवाल मालिकावीर
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
राजस्थानी युथ क्लब व बीसीटी इलेव्हन यांच्या संयुक्त विद्यमाने संगीता चिंडक स्मृती मारवाडी समाज मर्यादीत क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बालाजी फायटर्स संघाने रॉयल नाईट संघाचा 8 धावानी पराभव करून पहिला संगीता चिंडक स्मृती चषक पटकाविला. अष्टपैलू खेळाडू रोहित पोरवालला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात रॉयल नाईट संघाने अमर यात्रा संघाचा 9 गडय़ांनी तर दुसऱया उपांत्य सामन्यात बालाजी फायटर्स संघाने द रॉयल संघाचा 42 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कर्णधार रोहित पोरवालने 6 षटकार, 10 चौकारांसह 37 चेंडूत 107 धावांचा विक्रम केला. अंतिम सामन्यात बालाजी फायटर्सने 10 षटकात 4 बाद 105 धावा केल्या. त्यात अक्षय जैनने 2 षटकार, 6 चौकारांसह 28 चेंडूत 50, रोहित पोरवालने 1 षटकार, 4 चौकारांसह 41, धीरज वैष्णवने 11 धावा केल्या. रॉयल नाईटतर्फे गोपाल रायकाने 10 धावात 2, अमित जैन व रजत बंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल रॉयल नाईट संघाने 10 षटकात 4 बाद 105 धावाच केल्या. त्यात केतन पोरवालने 6 षटकार, 3 चौकारासह 28 चेंडूत 62, रजत जैनने 21, जतीन पोरवालने 13 धावा केल्या. बालाजीतर्फे अक्षित जैन, रजत पोरवाल, विक्रमसिंग, धीरज वैष्णव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे ज्योती चिंडक, निखिल चिंडक, मदनकुमार भैरपण्णावर, राहुल जारकीहोळी, विक्रम राजपुरोहित, मनोहर दायम, रमेश भाटी यांच्या हस्ते विजेत्या बालाजी फायटर्स तर उपविजेत्या रॉयल नाईट संघाला रोख रक्कम व पदके देऊन गौरविण्यात आले. सामनावीर अक्षय जैन (बालाजी फायटर्स), उत्कृष्ट फलंदाज धीरज (रॉयल नाईट्स), उत्कृष्ट गोलंदाज केतन पोरवाल (रॉयल नाईट्स) व मालिकावीर रोहित पोरवाल (बालाजी फायटर्स) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून आरिफ बाळेकुंद्री, रोहित पाटील तर स्कोअरर म्हणून शिवानंद पाटील यांनी काम पाहिले. सामन्यांचे समालोचन नासीर पठाण, आरिफ व संजय पोरवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोरवाल तर आभार कमलेश राजपुरोहित यांनी मानले.









