ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजप विरुध्द तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष काही केल्या संपताना दिसत नाही. विधानसभेतील निवडणुकीतून सुरु झालेला हा संघर्ष आजची कायम आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये होवू घातलेल्या पोटनिवडणुकीत हे राजकीय वैर पुन्हा दिसून आले. तृणमूल समर्थकांनी आता भाजप खासदारावरच हल्ला चढवला आहे.
भवानीपूर पोटनिवडणुकीत प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या जागेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. यामुळे तृणमूल आणि भाजपाने ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकदपणाला लावली आहे. ममता विरोधात भाजपाने प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप घोष यांची भवानीपूरमध्ये पदयात्रा सुरू होती. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या दरम्यान भाजपा आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. प्रचारादरम्यान तृणमूल समर्थकांनी दिलीप घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, जडुबाजार भाजपाची एक सभा भाजपाचे खासदार आणि बंगाल भाजपचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. त्याचवेळी काही तृणमूल कार्यकत्यांनी येऊन बैठकीत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तृणमूल समर्थकांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ता जखमी झाले. त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भवानीपूर विधानसभा जागेसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी या निवडणुकीत विजय आवश्यक आहे. कारण मे महिन्यात झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये त्यांना नंदीग्राम मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले होते.