पलुस / प्रतिनिधी
नोव्हेंबर महिना हा पक्षीप्रेमींना पक्षी निरिक्षणाची मोठी संधी घेऊन येत असतो. या काळात पाणथळीच्या ठिकाणी देश-विदेशातून पाहून पक्षी येत असतात. पलुस येथील इंगळे पाझर तलाव पक्षी निरिक्षणासाठी उत्तम पर्वणी ठरणार आहे. या तलाव परिसरात पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने पाहणी केली असता तब्बल ५० पेक्षा अधिक पक्षी पहायला मिळाल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे.
यावेळी धान तीरचिमणी, तांबूस शेपटीचा चंडोल, सामान्य तुतारी, पांढरा, पिवळा, करडा धोबी,कंठेरी चिखल्या, ठिपकेदार तुतवार, मलबारी मैना या सर्व पाहुण्या पक्षांनी तळ ठोकला असल्याचे दिसले. तर पानकावळा, पांढऱ्या छातीचा धीवर, काळा शराटी, रॉबिन, गोरली, मोठा बगळा, पांढया मानेचा करकोचा, चमचे, रंगीत करकोचा, मोहोळघार, वटवट्या, तांम्रमुखी टिटवी, शेकाट्या, मध्यम बगळा, रिव्हर टर्न, बामन मैना, हुदहुद, लाजरी पाणकोंबडी, कोतवाल, लालबुडी बुलबुल, भिंगरी, पारवा, खाटीक, कोकिळा, सुगरण, हळदीकुंकू बदक, लांब शेपटीचा सातभाई या स्थानिक तसेच स्थानिक स्थलांतरित पक्षीही मोठ्या संख्येने पहायला मिळत आहेत.
तर नाम्या वारकरी, माळ टिटवी या पक्षांचे तालुक्यात पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. तसेच रंगीत करकोचा आणि युरेशियन चमचा या पक्षांची संख्या लक्षणीय आहे. या पाझर तलावाची स्वच्छता राखल्यास व वेळोवेळी पाणी सोडल्यास हा परिसर पक्षांचे माहेरघर ठरणार असल्याची अपेक्षा संदीप नाझरे यांनी व्यक्त केली.








